Latest News

Latest News
Loading...

दुचाकी चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, तीन दुचाकी चोरटे अटकेत व चार दुचाक्या जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना प्रचंड वाढल्याने चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले होते. मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या रडारवर असतांनाच पोलिसांना मोटारसायकल चोरट्यांबाबत खात्रीदायक माहिती मिळाली. मोटारसायकल चोरट्यांपर्यंत पोहचण्याचा धागा गवसल्यानंतर पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांची साखळीच शोधून काढली. तीन मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या हाती लागले असून आणखी काही चोरटे पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. दुचाकी चोरट्यांचं अख्ख रॅकेटच उधळून लावण्याचे पोलिसांचे मनसुबे त्यांनी स्पष्ट केले आहेत. पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केलेले हे दुचाकी चोरटे आंतरजिल्हा टोळीचे सदस्य तर नाही ना, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरु आहे. पुनमचंद बंडू पोहिनकर (२४) रा. नांदा बीबी ता. कोरपना जि. चंद्रपूर, गोलू संजय वरवाडे (२१) रा. भद्रावती जि. चंद्रपूर, प्रफुल रमेश चौखे (२५) रा. गुडगाव ता. भद्रावती जि. चंद्रपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी चोरट्यांनी नावे असून त्यांच्या जवळून पोलिसांनी एकूण ४ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. 

शहरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलिसांवर मोटारसायकल चोरट्यांचा शोध लावून त्यांना जेरबंद करण्याचा दबाव वाढला होता. त्यामुळे पोलिस दुचाकी चोरट्यांचा कसून शोध घेत होते. अशातच पोलिसांना दुचाकी चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली. दुचाकी चोरट्यांपर्यंत पोहचण्याचा धागा गवसल्याने पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची अख्खी साकळीच शोधून काढली. दुचाकी चोरट्यांच्या ठाव ठिकाण्याबाबत ठाणेदारांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सपोनि झाडोकार व डीबी पथकाला भद्रावती येथे रवाना केले. पोलिस पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणावरून पुनमचंद बंडू पोहिनकर व गोलू संजय वरवाडे यांना अटक केली. त्यांच्या जवळून पोलिसांनी MH २९ AF ८३७८ क्रमांकाची मोटारसायकल जप्त केली. ही मोटार सायकल आशिष अशोक देठे यांची असून २७ जानेवारीला नंदिनी बार समोरून आरोपींनी ही मोटारसायकल लंपास केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांवर ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दुसऱ्या कार्यवाहीत पोलिसांनी बसस्थानक परिसरात दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दुचाकी चोरट्याला सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. पोहवा विकास धडसे यांना बसस्थानक परिसरात एक युवक विना क्रमांकाची दुचाकी विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी पोकॉ शुभम सोनुले व सागर सिडाम यांना सोबत घेऊन बसस्थानक गाठले. तेथे एक युवक दुचाकीसह संशयास्पद स्थितीत आढळून आला. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. प्रफुल रमेश चौखे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी तब्बल तीन चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. त्यातील MH २९ X ४६८८ ही दुचाकी गणेश शामराव ढुमणे यांची असून १६ सप्टेंबर २०२३ रोजी लक्ष्मीनगर येथून चोरट्यांनी ती लंपास केली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्याविरुद्ध ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरीचा सपाटा लावलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या जवळून चार दुचाक्या जप्त केल्या आहेत. पोलिस तपासातून आणखी काही दुचाकी चोरीच्या घटना निष्पन्न होण्याची शक्यता असून या चोरट्यांचे साथीदार लवकरच पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिस दुचाकी चोरट्यांचं रॅकेटच उधळून लावण्याच्या तयारीत आहेत. घर व दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दुचाक्या लंपास करण्याचा सपाटा लावून पोलिसांना हैराण करून सोडणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून पोउपनि. बलराम झाडोकार, सफौ. सुदर्शन वानोळे, पोहवा विकास धडसे, .पोना पंकज उंबरकर, पोकॉ विशाल गेडाम, वसीम शेख, श्याम राठोड, सागर सिडाम, शुभम सोनुले, गजानन कुडमेथे, यांनी केली.  

No comments:

Powered by Blogger.