Latest News

Latest News
Loading...

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण देरकर भारतीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित

प्रशांत चंदनखेडे वणी 

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण देरकर यांच्या कार्याची दखल घेऊन ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन तर्फे त्यांना भारतीय नारीरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या महिलांसाठीच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या सर्वोच्च नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात किरण देरकर यांना भारतीय नारीरत्न हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन कडून विविध क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यावेळी महिलांसाठी तळमळीने कार्य करणाऱ्या किरण देरकर यांची भारतीय नारीरत्न या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. किरण देरकर यांचं महिलांसाठीचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी महिलांना आत्मनिर्भर करण्याकरिता विविध प्रकारे सहकार्य केले. महिलांमध्ये स्वालंबी बाणा जागविला. परिस्थितीवर मात करण्याची जिद्द त्यांनी महिलांमध्ये निर्माण केली. विधवा महिलांच्या त्या आधार बनल्या. गरजू, गरीब महिलांना त्यांनी जगण्याचं बळ दिलं. महिलांमध्ये धेर्य व उम्मेद जागविण्याचं काम त्यांनी केलं. निराधार महिलांच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. महिलांसाठी संघटनात्मक कार्य करणाऱ्या किरण देरकर यांच्या कार्याची सिमा अफाट आहे. त्यांनी समाजाभिमुख अनेक कार्य केली आहेत. महिलांसाठी विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. महिलांच्या सन्मानासाठी त्या रणरागिणी बनून कार्य करीत आहेत. स्त्रियांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठीही त्यांनी नेहमी आवाज उठविला आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध त्यांनी वेळ प्रसंगी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. स्त्रियांना स्वाभिमानी जीवन जगता यावं यासाठी पोटतिडकीने कार्य करणाऱ्या किरण देरकर यांच्या कार्याची ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनने दखल घेतली. आणि त्यांना भारतीय नारीरत्न हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांना हा सर्वोच्च नारी रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

किरण देरकर यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय आपल्या सर्व सखींना व कुटुंबातील सर्व सदस्यांना दिले आहे. त्यांना हा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना म्हटले की, आज ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनने आपल्या कार्याची दखल घेत भारतीय नारीरत्न हा पुरस्कार दिला. त्याबद्दल सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन कडून मी त्यांचे आभार मानते. हा पुरस्कार माझ्या सोबत अहोरात्र काम करणाऱ्या माझ्या सर्व जिवलग सखींना, माझ्या कार्याचे कौतुक करीत मला कार्य करण्याचे स्वातंत्र्य व प्रेरणा देणाऱ्या माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तसेच आमच्या कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व समाजबांधवांना व सर्व विधवा सखींना मी हा पुरस्कार समर्पित करते. तसेच सर्वांच्या न्याय, हक्क अधिकारांसाठी निरंतर कार्य करण्याची ग्वाही देते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

No comments:

Powered by Blogger.