प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच असून एकापाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. तालुक्यात काल ५ मार्चला दोन आत्महत्यांच्या घटना घडल्या. नांदेपेरा येथिल एका महिलेने व डोर्ली येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी कुणी नसल्याची संधी साधून या दोघांनीही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेने मानसिक विवंचनेतून तर तरुणाने नैराश्येतून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात मृत्यूचा फास अधिकच घट्ट होऊ लागला आहे. जगण्याची उम्मेद सोडून मृत्यूला कवटाळले जात असल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेपेरा येथे वास्तव्यास असलेल्या संगीता महेंद्र निखाडे (४०) या महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. ही घटना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक महिला ही मानसिक आजारी असल्याचे समजते. तिच्यावर उपचार देखील सुरु असल्याचे कळते. घटनेच्या दिवशी आई व मुलगा दोघेही घरीच होते. मुलगा काही वेळाकरिता घराबाहेर पडला असता महिलेने गळफास घेतला. मुलगा घरी परतल्यानंतर त्याला महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्याने लगेच ही माहिती शेतात काम करीत असलेल्या आपल्या वडिलांना दिली. वडील तात्काळ घरी पोहचले. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला, आणि मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. संगीता निखाडे या महिलेच्या पश्च्यात पती व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
दुसरी आत्महत्येची घटना शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोर्ली या गावात घडली. डोर्ली येथे राहणाऱ्या स्वप्नील प्रकाश आडे (२४) या तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. घराच्या बैठक रूम मधील पंख्याला दोरीने गळफास लावून त्याने आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना काल ५ मार्चला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुणाने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. स्वप्नील या तरुणाच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस तपासातून ते समोर येणार आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहे.
No comments: