ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक, एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी
प्रशांत चंदनखेडे वणी
दुचाकी व ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 18 मार्चला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील राजूर फाट्यावर (रिंग रोड) घडली. ऑटोला ओव्हरटेक करतांना समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकी चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी ऑटोला धडकी. तर दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. यात ऑटो मधील प्रवासी महिला ऑटोखाली दबल्या गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही माहिती अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार प्रवासी घेऊन रजुरला जात असलेल्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी धडकली. कोल डेपोमध्ये काम करणारे कामगार या ऑटोमध्ये बसून रजुराला जात होते. दरम्यान पळसोनीकडे जात असलेल्या दुचाकी चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले. आणि दुचाकी ऑटोला धडकली. अचानक घडलेल्या प्रकाराने ऑटो चालकाचेही ऑटो वरील नियंत्रण सुटले, व ऑटो रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ऑटो मधील प्रवासी महिला गंगा संजय किनाके (35) रा. राजूर कॉलरी ही जागीच ठार झाली. तर उज्वला बंडू पाटील (39), अरुण श्रीधर कुळसंगे (40) दोघेही रा. राजूर (कॉ.) व दुचाकी चालक दिनेश कवडू येटे (47) रा. पळसोनी हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना आधी ग्रामीण रुग्णालयात तर नंतर चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या ऑटोमध्ये ऑटो चालकासह एकूण 7 प्रवासी प्रवास करीत होते. त्यापैकी एक ठार दोन गंभीर तर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दुचाकी चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऑटोला धडक दिली. आणि अचानक घडलेल्या प्रकाराने ऑटो चालकही बिथरला. त्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात एका महिलेचा करून अंत झाला. तसेच दुचाकी चालकही गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय मोडला आहे. दुचाकी चालक दिनेश येटे हा येथीलच एका कोळसा कंपनीत कामाला असल्याचे समजते. अनियंत्रित वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून यात निष्पाप जीवांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment