प्रशांत चंदनखेडे वणी
वणी पोलिस स्टेशन हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढू लागल्याने त्यावर प्रतिबंध लावण्याकरिता ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश गुन्हे शोध पथक व पोलिसांना दिले होते. ठाणेदारांच्या आदेशावरून गुन्हे शोध पथक व पोलिसांनी शोध मोहीम राबवून तीन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली होती. तसेच त्यांच्या जवळून चोरीच्या चार मोटारसायकल जप्त केल्या होत्या. त्यांच्या कडून मोटारसायकल चोरीच्या अन्य गुन्ह्यांची उकल करण्याकरिता या तीनही आरोपींचा पीसीआर मागण्यात आला होता. या दरम्यान त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मोटारसायकल चोरीच्या अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. त्यांच्या जवळून चोरीच्या आणखी दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. आता पर्यंत या तीन आरोपींकडून चोरीच्या ५ मोटारसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोटारसायकल चोरीच्या घटनांचा छडा लावण्याकरिता गुन्हे शोध पथक मोटारसायकल चोरट्यांचा कसून शोध घेत होते. दरम्यान त्यांना मोटारसायकल चोरट्यांबाबत गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातून दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली. त्यांच्या जवळून चोरीची एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली. ही कार्यवाही सपोनि बलराम झाडोकार यांच्या नेतृत्वात डीबी पथकाने केली.
मोटारसायकल चोरट्यावरील दुसरी कार्यवाही जमादार विकास धडसे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने केली. विकास धडसे यांना बसस्थानक परिसरात एक युवक विना क्रमांकाची मोटार सायकल विक्री करण्याकरिता ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस अंमलदार शुभम सोनुले व सागर सिडाम यांना सोबत घेऊन बसस्थानक परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांना एक युवक विना क्रमांकाच्या दुचाकीसह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने या युवकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने प्रफूल रमेश चौखे असे सांगितले. त्याला मोटारसायकलबाबत विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिस पथकाने त्याला पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. एवढेच नाही तर त्याने आणखी दोन मोटारसायकल चोरी केल्याचेही कबुल केले. त्याच्या जवळून पोलिस पथकाने ३ चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या. ही कार्यवाही ३ मार्चला करण्यात आली.
त्यानंतर या आरोपीकडून मोटारसायकल चोरीचे अन्य गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांकडून त्याचा पीसीआर मागण्यात आला. या दरम्यान आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने वणी येथून आणखी एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ३ जानेवारी २०२४ ला त्याने बजाज पल्सर आर.एस २०० (MH १२ QQ १७२८) ही दुचाकी लंपास केली होती. पोलिसांनी ही दुचाकी देखील त्याच्या जवळून जप्त केली आहे. तसेच चिमूर तालुक्यातूनही त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. ती चोरी केलेली मोटारसायकल त्याने भालर वसाहत येथे दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी भालर वसाहत येथून त्याने दिलेली विना क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. या तीनही आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ५ दुचाक्या जप्त केल्या असून दोन जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुनमचंद बंडू पोहिनकर (२४) रा. नांदा बीबी ता. कोरपना जि. चंद्रपूर, गोलू संजय वरवाडे (२१) रा. भद्रावती जि. चंद्रपूर, प्रफुल रमेश चौखे (२५) रा. गुडगाव ता. भद्रावती जि. चंद्रपूर या तीनही आरोपींवर ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या जवळून MH 29 AF 8378, MH 12 QQ 1728 या क्रमांक असलेल्या तर तीन विना क्रमांकाच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. प्रफुल चौखे या मोटारसायकल चोरट्याजवळून तब्बल चार चोरीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस पथकाने मोटारसायकल चोरट्यांवर केलेल्या या धडक कार्यवाहीने मोटारसायकल चोरट्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून सपोनि बलराम झाडोकार, सफौ. सुदर्शन वानोळे, जमादार विकास धडसे, पोलिस अंमलदार सागर सिडाम, शुभम सोनुले, पंकज उंबरकर, मो. वसीम, शाम राठोड, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.
No comments: