प्रशांत चंदनखेडे वणी
वेकोलिच्या कुंभारखनी कोळसाखाणीत कर्तव्यरत असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला दोघाजणांनी बेदम मारहाण केल्याची घटना ५ मार्चला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सुरक्षा रक्षकाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी दोनही आरोपींवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणारी कुंभारखनी कोळसाखान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या कोळसाखाणीत कोळसा वाहतूकदारांची मोठी दादागिरी पाहयला मिळते. या कोळसाखाणीतील सुरक्षा रक्षकांवर हल्ले झाल्याचे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. कुंभारखनी कोळसाखाणीत कार्यरत असलेल्या आकाश देवराव कावडे (३३) रा. कुंभारखनी कॉलनी या सुरक्षा रक्षकाला दोन कोळसा वाहतूकदारांनी अरेरावी करीत बेदम मारहाण केली. आकाश कावडे हा सुरक्षा रक्षक कोळसाखाणीत कर्तव्य बजावत असतांना दोन कोळसा वाहतूकदार स्कॉर्पियो या वाहनाने कोळसाखाणीत आले. त्यांनी सरळ वाहन सीएचपी (ट्रकांमध्ये कोळसा भरण्याचे ठिकाण) जवळ नेले. सुरक्षा रक्षकाने त्याठिकाणी वाहन नेण्यास परवानगी नसल्याचे सांगत तेथून वाहन हटविण्यास सांगितले. परंतु त्या दोघांनी सुरक्षा रक्षकालाच दम देऊन त्याच्याशी हुज्जत घालणे सुरु केले. ते दोघेही एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी ऑन ड्युटी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. यावरून कोळसा वाहतूकदारांच्या हिंमती किती वाढल्या आहेत याची प्रचिती येते. कोळसा वाहतूकदारांनी केलेल्या मारहाणीबाबत आकाश कावडे या सुरक्षा रक्षकाने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मेघदूत कॉलनी येथे राहणाऱ्या महेश मातंगी (४०) व तिरुपती नामक आरोपींवर भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०४ ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय दत्ता पेंडकर करीत आहे
No comments: