नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले, तेली फैल येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून युवावर्ग नैराश्येतून आत्महत्या करू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरासह तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच असून मानसिक खच्चीकरणातून युवक आत्महत्या करू लागले आहेत. एका पाठोपाठ एक होत असलेल्या आत्महत्यांमुळे तालुका हादरला आहे. आज आणखी एका वैफल्यग्रस्त तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली. राहत्या घरीच त्याने गळफास घेतला. घराच्या हॉलच्या छताला असलेल्या लोखंडी हुकला दुपट्याने गळफास घेऊन अक्षय चौधरी या तरुणाने आत्महत्या केली. घराशेजारी राहणाऱ्या त्याच्या चुलत बहिणीला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने ही माहिती आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी घराकडे धाव घेत घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अक्षयच्या आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलिस त्याच्या आत्महत्या करण्यामागच्या कारणांचा शोध घेत आहे. अक्षयने असा हा आत्मघाती निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment