राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यावर डीबी पथकाची कार्यवाही, मटकापट्टी फाडणारा अटकेत
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉ.) येथे मटका जुगार जोमात सुरु असल्याची माहिती ठाणेदार अनिल बेहेरानी यांना मिळताच त्यांनी डीबी पथकाला राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यांवर कार्यवाही कारण्याचे आदेश दिले. डीबी पथकाने राजूर (कॉ.) येथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यांबाबत माहिती मिळवून भगतसिंग चौकातील गल्लीत सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच मटका जुगार खेळणारे पळत सुटले. पण मटका पट्टी फाडणारा मात्र डीबी पथकाच्या हाती लागला. डीबी पथकाने त्याला अटक करून त्याच्या जवळून रोख रक्कम व मटका जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. शैलेश भगवान मेश्राम (४८) रा. राजूर (कॉ.) असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मटका अड्ड्यावरील ही कार्यवाही १५ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.
राजूर (कॉ.) येथे अवैध धंदे फोफावले असून गल्लीबोळात मटका अड्डे व अवैध दारू विक्री सुरु असल्याची ओरड गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मटका लावणारे अनेक जण कर्जबाजारी होऊन देशोधडीला आले आहेत. मटक्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मटका खेळून झटपट पैसे मिळविण्याच्या मोहात अनेक जण कष्टाचे पैसेही गमावतांना दिसत आहेत. राजूर (कॉ.) येथे कामगार, रोजंदार व मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हा वर्ग मोठ्या प्रमाणात मटक्याच्या आहारी गेला असून आपल्या श्रमाचा पैसाही ते मटक्यावर उधळताना दिसतात. मटका अड्डे चालविणारे मात्र पैशाने रग्गड बनले असून त्यांनी गावात ठिकठिकाणी मटका अड्डे सुरु केले आहेत. अवैध धंद्यात ते चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कधी मटका अड्ड्यावर पोलिसांनी कार्यवाही केली, तरी मटक्याचा मालक मात्र पोलिसांच्या हाती लागत नाही. मटक्याची उतारी घेणाराच पोलिसांच्या हाती लागतो. मटका मालक फरारीत असतांनाही मटका अड्डा मात्र काही दिवसांनी जैसे थे सुरु होतो. काही दिवसांपूर्वी तेलगू वार्ड येथील मटका अड्ड्यावर पोलिसांनी कार्यवाही केली होती. त्यावेळीही मटका मालक फरार झाला होता. मालक फरारीतच असतांना मटका अड्डा मात्र जैसे थे सुरु झाला. यावेळीही डीबी पथकाने भगतसिंग चौक येथे सुमडीत सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. आणि यावेळीही तेच घडले. मटक्याच्या आकड्यांवर पैशाची उतारी घेणारा शैलेश भगवान मेश्राम हाच पोलिसांना रंगेहात सापडला. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या जवळून मटका साहित्य व रोख रक्कम असा एकूण ४६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर मजुका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या आदेशावरून डीबी पथकाने केली.
Comments
Post a Comment