रखरखत्या उन्हातही मतदारांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झाले ६७.५७ टक्के मतदान
प्रशांत चंदनखेडे वणी
सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मात्र उन्हाचे चटके सोसूनही नागरिकांनी मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभा निवडणूक म्हणजे एकप्रकारे लोकशाहीचा उत्सवच असल्याचं वातावरण निर्माण करण्यात आल्याने लोकांनीही या उत्सवात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. पुरूषांसोबतच महिलांनीही मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. रखरखत्या उन्हातही महिलांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण ६७.५७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ५ लाख ८३ हजार ५४१ महिला तर ६ लाख ५८ हजार ४०० पुरुष मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ३७ हजार ९०७ मतदार आहेत. त्यापैकी १२ लाख ४१ हजार ९५२ मतदारांनी मतदान केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. यात सर्वाधिक ७३.२४ टक्के मतदान वणी विधानसभा क्षेत्रात झाले. त्याचबरोबर राजुरा ७०.०९ टक्के, चंद्रपूर ५८.४३ टक्के, बल्लारपूर ६८.३७ टक्के, वरोरा ६७.७३ टक्के तर आर्णी विधानसभा मतदार संघात ६९.५२ टक्के मतदान झाले आहे. वणी विधानसभा क्षेत्रात ३३८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. वणी शहरात ४८ तर तालुक्यात १८६ मतदान केंद्र देण्यात आली होती. सर्वच मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्वच सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सर्वच केंद्रांवर शिस्तीत मतदान करण्यात आले. पोलिसांचाही चोख बंदोबस्त दिसून आला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्या सर्वांचच भाग्य आता मशिनबंद झालं असून विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हा सस्पेन्स मत मोजणीनंतरच दूर होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये मतदानाची ओढ पहायला मिळाली. निवडणूक व लग्नाची तारीख एक आल्याने लग्न वऱ्हाडात विचारांचं काहूर माजलं असतांनाच नवरदेवांनी मात्र लग्नाच्या धामधुमीतूनही थोडी उसंत काढत आधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. नवरदेवाचा पोशाख घालूनच ते मतदार केंद्रावर गेल्याने अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या. जीवनातील आनंदाचा व महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. पण या आनंदातच नवरदेवांनी लोकशाहीच्या उत्सवातही सहभाग दर्शविल्याने ते सर्वांच्या प्रशंसेनेस पात्र ठरले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. युवावर्ग देशाप्रती आपलं कर्तव्य पार पाडू लागल्याने त्यांच्यात आदर्श विचारांची पेरणी होऊ लागल्याच्या भावना जनमाणसांतून व्यक्त होतांना दिसल्या. वणी तालुक्यातील लाठी (बेसा) येथील राहुल खिरटकर व गणेशपूर येथील गौरव लेडांगे या दोन नवरदेवांनी बोहल्यावर चढण्यापूर्वी व लग्नाची वरात काढण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला. त्यांनी लग्नाच्या घटकेतुनही मतदानासाठी वेळ काढून देशाप्रती आपलं कर्तव्य निभवल्याने मतदारांमध्ये एक चांगला संदेश पोहचला. असे असतांनाही मतदार याद्यांमध्ये नावे शोधतांना मात्र अनेकांचा गोंधळ उडतांना दिसला. मतदार याद्यांमध्ये नावे शोधतांना मतदारांना चांगलीच कसरत करावी लागली. कित्येक मतदारांची तर मतदार याद्यांमध्ये नावेच नसल्याने त्यांच्यातून कमालीची नाराजी व्यक्त होतांना दिसली. मतदार याद्यांमधून नावे गहाळ झाल्याने अनेक मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित रहावे लागले. मतदार जनजागृती करतांना मतदारांच्या नोंदी घेण्याकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याने मतदारांमधून संताप व्यक्त होतांना दिसला. या उपरांतही वणी विधानसभा क्षेत्रात लक्षवेधी मतदान झाले आहे.
Comments
Post a Comment