१८ लाख ३६ हजार मतदार ठरवतील १५ उमेदवारांच भाग्य, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कुणाला मिळेल मतदारांचा कौल
प्रशांत चंदनखेडे वणी
केंद्रातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपल्याने पुढील पाच वर्ष देशाच्या राजकारणाची सूत्रे कुणाच्या हातात द्यायची व कुणाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यायची, हे ठरविण्याची जबाबदारी परत एकदा लोकसभा निवडणुकीच्या रूपाने जनतेवर आली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला आहे. १७ एप्रिल हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असून १८ एप्रिल पासून प्रचार तोफा थंडावणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील पाच मतदार संघाची निवडणूक होणार असून यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचाही समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, वंचितचे राजेश बेले व बसपचे राजेंद्र रामटेके यांचा समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी या विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून येथील १८ लाख ३६ हजार मतदार उमेदवारांच भाग्य ठरवणार आहे. मतदारांचा कौल कुणाला मिळतो, यावर उमेदवाराच्या विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. देशात आतापर्यंत लोकसभेच्या १७ पंचवार्षिक निवडणूका झाल्या असून २०२४ ची ही १८ वी लोकसभा निवडणूक आहे.
देशात झालेल्या एकूण लोकसभा निवडणुकी व पक्षाचे राहिलेले प्राबल्य
१९५२ साली देशात लोकसभेची पहिली निवडणूक झाली. यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला होता. १९५७ सालीही काँग्रेसचं सत्तेत आली. १९६२, १९६७, १९७१ या सालातही देशात काँग्रेसचीच सत्ता राहिली. मात्र १९७७ साली झालेल्या कोलसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला. आणीबाणीच्या काळानंतर काँग्रेसला १५४ जागाच जिंकता आल्या. तर जनता पार्टीने २१८ जागांवर विजय मिळविला होता.
१९८० साली परत काँग्रेसने पुनरागमन करीत ३५३ जागा जिंकल्या. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील जनता खंबीरपणे काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली, व काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत ४१५ जागांचा टप्पा गाठला.
१९८९ साली काँग्रेसला केवळ १९७ जागाच जिंकता आल्या, व सत्ता परिवर्तन झालं. या निवडणुकीत जनता दल १४१ जागा जिंकून प्रथमच तिसरा मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला. मात्र दोन वर्षातच १९९१ ला परत लोकसभेची निवडणूक झाली व राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने २३२ जागांवर विजय संपादन करून देशात आपलं सरकार स्थापन केलं.
परंतु १९९६ ची लोकसभा निवडणूक राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपने १६१ जागांवर विजय मिळवून काँग्रेसची पीछेहाट केली. काँग्रेसला केवळ १४० जागांवरच समाधान मानव लागलं होतं. १९९८ साली परत लोकसभा निवडणूक झाली, व भाजपने संधीच सोनं केलं. या निवडणुकीत भाजपने १८२ जागांवर विजय मिळविला, तर काँग्रेसच्या वाट्याला केवळ १४१ जागाच आल्या. १९९९ साली लोकसभेची १३ वी निवडणूक झाली, व अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीएने देशात सरकार स्थापन केलं.
परंतु २००४ साली काँग्रेसने परत मुसंडी मारली, व मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात देशात काँग्रेसचं सरकार आलं. यावेळी काँग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. २००९ साली मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वावर पुन्हा जनतेने विश्वास दाखविला. आणि २०६ जागा जिंकून काँग्रेस सत्तेत आली. या निवडणुकीत भाजपला ११६ जागाच जिंकता आल्या होत्या.
मात्र २०१४ मध्ये भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर लोकसभेची निवडणूक लढविली, व देशात मोदींची लहर आली. या लोकसभा निवडणुकीत भाजपने २८२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. आणि देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली. येथून मात्र काँग्रेला पडझड सुरु झाली. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ४४ जागाच जिंकता आल्या होत्या. देशाच्या राजकारणातली ही मोठी उलथापालथ मनाली गेली.
२०१९ साली लोकसभेची १७ वी निवडणूक पार पडली. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम राहिली. या निवडणुकीत भाजपने ३०३ जागांवर विजय मिळावीत देशातील आपली सत्ता कायम राखली. काँग्रेसची मात्र २०१४ प्रमाणे २०१९ च्या निवडणुकीतही दयनीय अवस्था झाली. काँग्रेला केवळ ५२ जागांवरच विजय मिळविता आला.
२०२४ मध्ये १८ व्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक सत्तेत हायट्रीक व सत्ता बदल यासाठी निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य देखील पणाला लागलं आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचं भाकीत वर्तविलं जात आहे. त्यामुळे आता देशात सत्ता परिवर्तन होते, की भाजपची सत्तेत हायट्रीक होते, याकडे संपूर्ण देशाचं व जगाचं देखील लक्ष लागलं आहे.
२०२४ च्या चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पक्षाचे दावे व प्रचार सभांचा झंजावात
प्रचार सभांमधून पक्ष नेत्यांनी एकमेकांचे उणे उटे काढले. एकमेकांवर टोकाची टीका केली. आरोप प्रत्यारोप केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. तर काँग्रेसने भाजपचा विजयी रथ रोखण्याकरिता कंबर कसली आहे. त्यातच वंचितनेही तगडं आव्हान उभं केलं आहे. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही विरुद्ध वंचितांचे अधिकार असा हा निवडणूक प्रचार रंगला असून भाजपने देशाला विकासाच्या मार्गावर नेल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसने विकासाचा हिशोब मागितला आहे. वंचितने तर सत्ता परिवर्तनाचा नाराच दिला असून २०२४ ची निवडणूक देशासाठी निर्णायक निवडणूक ठरणार असल्याचे म्हटले आहे. भाजपने देशाच्या विकासाला गती दिल्याचे म्हटले आहे. देशवासीयांचा आर्थिक स्थर उंचावल्याचाही त्यांनी दावा केला आहे. देशवासियांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या असून स्वयंरोजगाराला चालना देण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. भारत हा जगातली आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असून अनेक देशांनी भारतात गुंतवणूक केल्याचेही भाजपने स्पष्ट केले आहे. भारतीय जनतेला सर्व सोइ सुविधा व त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्याकरिता शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही भाजपने प्रचार सभांमधून सांगितले आहे.
या उलट काँग्रेसने आमच्या विकासाचा हिशोब द्या, असा नारा दिला आहे. देशात हुकूमशहा पद्धतीने सरकार चालवलं जात असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. विरोधकांना संपविण्याकरिता ईडी षडयंत्र रचण्यात आलं आहे. संविधान बदलविण्याची भाषा केली जात आहे. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहे. जातीभेदाचं राजकारण केलं जात आहे. देशाचा पंतप्रधान धर्मनिरपेक्ष नसून भारत सरकारला मोदी सरकार संबोधत आहे. देशात महागाईचा वानवा पेटला आहे. बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या आहेत. शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे. शैक्षणिक साहित्यांवर जीएसटी लावण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सरकार विरोधात आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबल्या जात आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. देशात आत्महत्या वाढल्या आहेत. शासकीय मालमत्ता व्यापाऱ्यांना विकली जात आहे. गरीब आणखीच गरीब होत आहे. तर श्रीमंत अधिक श्रीमंत होतांना दिसत आहे. त्यामुळे हे सरकार देश हिताचे नसून देश विघातक असल्याचे काँग्रेसने प्रचार सभांमधून म्हटले आहे. वंचितनेही भाजपवर निशाणा साधत हे सरकार दादागिरीचं सरकार असल्याचे प्रचार सभेत म्हटले. त्यामुळे आता मतदारांनीच ठरवायचं, की सत्तेची चावी कुणाच्या पाहत द्यायची. मतदारच देशाच्या वाटचालीची पुढील दिशा ठरवतात. त्यामुळे पुढील पाच वर्ष कुणाच्या हातात देश चालवायला द्यायचा, हा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गाजविल्या प्रचार सभा तर सिनेनटांची पहायला मिळाली मांदियाळी
चंद्र्पुर येथे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झंझावती सभा झाली. त्यांनी देशात केलेल्या विकास कामांचा आराखडाच जनतेसमोर मांडला. त्यांनी भाजपच्या प्रत्येकच उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ वणी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा झाली. त्यांनी भाजपने जनतेसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच दिवंगत खासदारांनी कोणता विकास केला हे सर्व जनतेलाच माहिती असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मारला. तसेच चंद्रपूर येथे कन्हैया कुमार यांचीही झंझावती सभा झाली. त्यांनी भाजपच्या राजकारणावर चौफेर टीका केली. त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भद्रावती व वरोरा येथे सुनील शेट्टी तर वणी येथे रविना टंडन यांनी हजेरी लावली. सुधीर मुनगंटीवार यांच्या कामांचं दोघांनीही तोंड भरून कौतुक केलं. आज पासून प्रचार तोफा थंडावल्या असून केवळ भेटी गाठी उरल्या आहेत. त्यामुळे आता मतदार कोणत्या पक्षाला कौल देतात, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Comments
Post a Comment