विठ्ठलवाडीकडे जाणारा रस्ता बनला लॉनची पार्किंग, नगर पालिका व वाहतूक विभाग घेईल काय कार्यवाहीची तसदी
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील विठ्ठलवाडीकडे जाणारा प्रमुख रस्ता नेहमी वाहनांनी वेढलेला असतो. रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहने उभी करण्यासाठी, की रहदारीसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरच लॉन व मॅरेज हॉल असल्याने लग्नसमारंभात येणारी वाहने पुरेशा पार्किंग व्यवस्थेअभावी रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे याठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी केली जात असल्याने येथे नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो. एवढेच नाही तर रस्त्यावरच स्वयंपाकाचे भट्टे लावले जातात. लॉन समोर रस्त्यावर तासंतास लग्नवरातीचे नाचगाणे सुरु असते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. लॉन व मॅरेज हॉल उभारतांना व्यावसायिकाला पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्याचे सोयसुतकच न राहिल्याने प्रमुख रस्ताच लग्नसमारंभात येणाऱ्या वाहनांची पार्किंग बनला आहे. त्यामुळे रहदारीला नेहमी अडथळे निर्माण होत असल्याने विठ्ठलवाडी परिसरातील नागरिक कमालीचे वैतागले आहेत. नगरपालिका प्रशासन व वाहतूक विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे लॉन व्यवसायीकापुढे नगर पालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासन व वाहतूक विभाग लॉन व्यावसायिकाला कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा कोणतीही कार्यवाही करतांना दिसत नाही. त्यामुळे लॉन मालकाकडून त्यांचे हितसंबंध जोपासले जात असल्याची खुली चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.
विठ्ठलवाडी परिसरातून शहराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील एसबी लॉन समोर नेहमी वाहनांची वर्दळ पहायला मिळते. लॉनमध्ये येणाऱ्या वाहनांनी संपूर्ण रस्ताच वेढलेला दिसतो. एसीबी लॉनला पार्किंगची प्रशस्त जागा नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. रस्त्यावर वाहनांचा अक्षरशः खच पडलेला दिसतो. अगदीच निष्काळजीपणे रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने हा रस्ता, की पार्किंग झोन हा प्रश्न निर्माण होत आहे. रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे रहदारीला अडथळेच नाही तर रहदारीच ठप्प पडतांना दिसत आहे. या रस्त्यावरून चारचाकी तर सोडाच दुचाकी चालविणे देखील कठीण होऊन बसले आहे. लॉन मालकाचे पार्किंग सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने लॉनमध्ये येणाऱ्या वाहनांच्या रस्त्यावरच रांगा लागलेल्या पहायला मिळतात. त्यामुळे रहदारीसाठी असलेला हा रस्ता लॉनची पार्किंग बनला आहे. शासकीय रस्त्यावर मनमानी पद्धतीने वाहने उभी केली जात असतांनाही नगर पालिका प्रशासन व वाहतूक विभाग कुठल्याही प्रकारची कार्यवाही करतांना दिसत नाही. त्यामुळे ते एकमेकांचे हितसंबंध जोपासत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. लॉन मधील स्वयंपाकाचे भट्टे देखील आता रस्त्यावर लावले जात आहे. रस्त्यावर भट्टे लावून जळत्या निखाऱ्यावर स्वयंपाक केला जात असून विस्तवाच्या ठिणग्या रस्त्यावर उडतांना दिसतात. त्यामुळे उडणारी ठिणगी आगीचे कारण बनू नये ही भीती देखील वर्तविली जात आहे. आपलं कोण काय करेल या अविर्भावात मनमानी व रहदारीला अडथळे निर्माण केले जात आहे. पण नगर पालिका प्रशासन व वाहतूक विभाग मात्र हतबलता दर्शवित आहे. त्यामुळे आता लॉनमध्ये येणाऱ्या वाहनांमुळे रहदारीला अडथळे निर्माण झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
विठ्ठलवाडी परिसरातून वणी वरोरा मुख्य मार्गाला जोडणारा हा रस्ता नव्यानेच बांधण्यात आला आहे. विठ्ठलवाडी, गौरकार कॉलनी व रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याने मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. मुख्य बाजारपेठेत जाण्याकरिता येथील नागरिक याच रस्त्याचा वापर करतात. तसेच येथील नागरिकांसाठी हा सरळ, सोपा व प्रमुख मार्गक्रमणाचा रस्ता बनला आहे. परंतु हा रास्ता नेहमी वाहनांनी वेढलेला असतो. रस्त्यावर ठिकठिकाणी नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जातात. काही खाजगी ट्रॅव्हल्स बसेसही याच रस्त्यावर उभ्या केल्या जातात. या रस्त्यावर वॉशिंग सेंटर देखील सुरु करण्यात आले आहे. अगदी रस्त्यावरच वॉशिंग सेंटर सुरु करण्यात आल्याने रस्त्यावरून सारखे पाणी वाहत असते. त्यामुळे याठिकाणी रस्त्यावर खड्डे देखील निर्माण झाले आहे. तसेच प्रेशरने पाणी मारून वाहने धुतली जात असल्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. जाणे येणे करतांना अंगावर पाणी उडत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. याकडेही नगर पालिकेने लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे.
Comments
Post a Comment