पटवारी कॉलनी येथे राहत्या घरी सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी पावणे नऊ लाखांचा ऐवज लुटला

प्रशांत चंदनखेडे वणी 

सेवानिवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना ५ एप्रिलला पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनी परिसरातील दीनानाथ नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष वासुदेव पिदूरकर यांच्या राहत्या घरी ४ ते ५ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. कुटुंबं घरातच झोपलेलं असतांना घरात प्रवेश करून व शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी पावणे नऊ लाखांचा ऐवज लुटून नेला. या धाडसी दरोड्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

पटवारी कॉलनी येथे परिवारासह राहत असलेले सुभाष पिदूरकर हे सेवानिवृत्त वेकोलि कर्मचारी आहेत. त्यांना चार मुली असून तीन मुलींचे लग्न झाले आहे. एक मुलगी व पती, पत्नी असे तीन जण पटवारी कॉलनी येथील घरी राहतात. रात्री कुटुंबातील सदस्य झोपी गेल्यानंतर पहाटे २.३० वाजताच्या सुमारास चार ते पाचच्या संख्येने असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा तोडण्याच्या आवाजाने कुटुंबं झोपेतून खडबडून जागं झालं. कुटुंबीयांनी दरवाजाच्या दिशेने जाऊन बघितले असता त्यांना हातात शस्त्र व तोंड बांधून असलेले चार ते पाच इसम घरात शिरल्याचे दिसले. समोर दरोडेखोर पाहून त्यांची बोबडीच वळली. दरोडेखोरांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून घरातील मौल्यवान वस्तू, दागदागिने व रोख रक्कम ठेऊन असलेल्या जागेची माहिती मिळविली. कुटुंबीयांनीही जिवाच्या भीतीने घरातील ऐवज दरोडेखोरांच्या स्वाधीन केला. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर घरातील एकूण ८ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. सुवर्ण दागिन्यांसह रोख रक्कम, बँकेचे फिक्स बॉण्ड, दोन एलआयसी पॉलिसी, बँकेचे व पोस्टाचे पासबुक, दागदागिन्यांचे बिल व पावत्या तसेच पती पत्नीचे कपडे व साड्या देखील या चोरट्यांनी चोरून नेल्या. अगदीच शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनीतील राहत्या घरी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर व तालुक्यात चोरी व घरफोडीच्या घटना घडत असतांनाच आता घरावर पडू लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वणी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी कारवाया वाढू लागल्याने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. 

दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर घरातील ऐवज लुटून नेल्याची तक्रार सुभाष पिदूरकर यांनी पोलिस स्टेशनला दाखल केली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध भादंविच्या कलम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी