शिरपूर पोलिसांनी रोखली गोवंश जनावरांची तस्करी, ८ गोवंश जनावरांची केली सुटका
प्रशांत चंदनखेडे वणी
सैदाबाद शेत शिवारात एका मालवाहू पिकअप वाहनात गोवंश जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तली करीता नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना एक मालवाहू पिकअप वाहन उभे दिसले. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात लोखंडी अँगलला दोराने बांधून असलेले आठ बैल आढळून आले. अतिशय निर्दयीपणे या बैलांना वाहनात कोंबण्यात आले होते. वाहन चालकाकडे गोवंश जनावरांच्या वाहतुकीबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे मालवाहू वाहनातून गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या बालाजी हरिदास मोहितकर (४४) व गौरव बालाजी मोहितकर (२३) दोघेही रा. राईकोट, ता. झरीजामणी या दोघांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५, १९६० व १९५१ च्या विविध कलमांप्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. त्यांच्या तावडीतून ८ बैलांची सुटका करण्यात आली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक पिकअप वाहन (MH २९ BE ६८१२), एक मोटारसायकल (MH २९ कंद ४३) व ८ गोवंश जनावरे असा एकूण ४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही धडक कार्यवाही ठाणेदार माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रावसाहेब बुधवंत यांनी केली. घटनेचा पुढील तपास एएसआय प्रविण गायकवाड, नापोका अनिल सुरपाम करीत आहे.
Comments
Post a Comment