देशवासीयांनी एकजुटीने साजरा करावा हा लोकशाहीचा उत्सव, आणि ठरवावी देशाच्या वाटचालीची पुढील दिशा


प्रशांत चंदनखेडे वणी 

लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरिता लोकांनी एकवटलं पाहिजे. संविधानाने दिलेला अधिकार जोपासला पाहिजे. प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाही ही देशाची ताकद आहे. लोकांनी ही ताकद मतदानातून दाखवून दिली पाहिजे. आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाहीच्या या उत्सवाला सर्वांगीण रूप दिलं पाहिजे. विविध भाषा आणि वेगवेगळी वेशभूषा या आगळ्यावेगळ्या संस्कृतीने नटलेला हा आपला देश आहे. मानवी संकल्पना अंगिकारणारा हा देश असून आपुलकी व बंधुभावाने नांदणारी लोकशाही या देशाला मिळालेलं एक वरदान आहे. जनता ही सर्वोच्च असून लोकच या देशाचे सरकार आहेत. देशाचं राजकारणही लोकांभोवतीच फिरतं. देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हे ठरविण्याचा अधिकारही संविधानाने जनतेला दिला आहे. त्यामुळे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला मतदानाचा अधिकार सर्वांनीच बजावला पाहिजे, हा संदेश प्रशासनाकडून दिला जात आहे. प्रशासनानाने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली असून मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. जनतेचं मत हे बहुमूल्य असून जनतेच्या मतातूनच देशाची पुढील वाटचाल ठरते. त्यामुळे जनतेने कुठल्याही परिस्थितीत मतदान केलं पाहिजे, हे प्रशासनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून पटवून दिलं जात आहे. एवढेच नाही तर मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता प्रशासनाकडून सायकल रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं. या सायकल रॅलीत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा पडघम वाजला आहे. देशात वेगवेगळ्या टप्प्यात ही निवडणूक होत आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल पासून सुरु होत आहे. या टप्यात चंद्रपूर लोकसभेचा देखील समावेश आहे. सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असलेल्या या लोकसभा मतदार क्षेत्रात मतदारांचा उत्साह वाढविण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार गाजवावा, म्हणून प्रशासन पोटतिडकीने प्रयत्न करीत आहे. महसूल विभाग, पंचायत समिती, पोलिस प्रशासन व नगर पालिका प्रशासन मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याचा हरसंभव प्रयत्न करतांना दिसत आहे. मतदान ही लोकशाही प्रधान देशाची खरी ताकद असून मतदानाच्या माध्यमातून आपली ताकद व एकजूट दाखविण्याची दर पाच वर्षांनी मतदारांना संधी मिळते. त्यामुळे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून देशाच्या वाटचालीचा मार्ग निश्चित करावा. देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी कुणाला द्यायची हा अधिकार जनतेचा असून जनतेने मतदानाच्या माध्यमातून आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. देशात गुण्यागोविंदानं नांदणारी लोकशाही तशीच पुढेही नांदत रहावी, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि लोकशाहीचं संवर्धन करण्याकरिता मतदान करणं गरजेचं आहे. आपल्या मतदानातून देशाच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे. आपल्या मतातूनच आपल्या विचारांचे प्रतिनिधी निवडले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावावा, हा जनहितार्थ संदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. मतदार जनजागृतीकरिता प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करीत आहे. मतदान करण्याकरिता मतदारांचा उत्साह वाढावा, याकरिता प्रशासनाने वेगवेगळे उपक्रमही हाती घेतले आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान करण्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी