प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील मुख्य भाजी मार्केट जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर चक्क वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी धडक दिल्याने मटका जुगार खेळणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. आमदार थेट मटका सुरु असलेल्या ठीय्याजवळ आल्याचे पाहून मटकाबहाद्दरांनी तेथून धूम ठोकली. मटका पट्टी फाडणाऱ्यासह मटका खेळणारे मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले. आमदारांनी मटका अड्ड्यावर धडक दिल्याने पोलिस विभागात मात्र एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या भूमिकेवरच आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना उधाण आले आहे. मटका जुगारासह इतरही अवैध धंदे बिनधास्त सुरु आहेत. शहरापासून जवळच असलेल्या राजूर कॉलरी येथेही खुलेआम मटका अड्डे सुरु असून गावकऱ्यांच्या तक्रारी नंतरही मटका अड्ड्यांवर कार्यवाही केली जात नसल्याने गावकऱ्यांमधून पोलिस प्रशासनाविषयी कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
शहरात ठिकठिकाणी मटका अड्डे सुरु आहेत. अवैध व्यवसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी देखील मटका अड्डे थाटले आहेत. पोलिसांनी मटका अड्ड्यांना परवानगी दिली की, पोलिस मटका अड्ड्यांवर कार्यवाही करण्यास धजावत नाही, हेच कळायला मार्ग नाही. शहरात मटका अड्डे कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हा प्राश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. शहरात मटका अड्डे चालविण्याची परवानगी देण्यात आली, की पोलिसांना संबंध जोपासावे लागत आहे, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. हित संबंधामुळे मटका अड्ड्यांना मुभा देण्यात आल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे. शहरात मटका अड्डे कुणाच्या परवानगीने सुरु आहेत, हा देखील चर्चेचा विषय बनला आहे. मटका अड्ड्यांना परवानगी नसेल तर मग पोलिसांकडून मटका अड्ड्यांवर कार्यवाही का केली जात नाही, हा देखील प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
सुजाता टॉकीज जवळ राजरोसपणे मटका अड्डा सुरु आहे. खुलेआम खुर्च्या टेबल लावून मटका पट्टी फाडली जाते. परंतु पोलिस मात्र त्या ठिकाणी धाड टाकण्यास धजावत नाही. भाजी मंडी परिसरात मटका अड्डा सुरु असल्याची माहिती थेट आमदारांना देण्यात आल्याने आमदारांनी त्या ठिकाणी सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर ९ मे ला सायंकाळी धडक दिली. एपीआय दत्ता पेंडकर व काही पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन आमदार भाजी मंडी परिसरात पोहचले. तेथे त्यांना मटका पट्टी सुरु असल्याचे आढळले. ते मटका पट्टी फाडण्याच्या ठीय्याजवळ जात नाही तोच मटकाबहाद्दरांनी तेथून धूम ठोकली. त्याठिकाणी केवळ एक विद्युत बल्ब सुरु असल्याचे आढळून आले. यावेळी आमदारांनी शहरासह तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत आल्याचे मान्य करतांनाच मटका अड्डे सुरु असलेल्या ठिकाणाची कुणी माहिती दिल्यास त्या मटका अड्ड्यावर थेट कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. आमदारांच्या मटका अड्ड्यावरील कार्यवाहीमुळे पोलिसांची मात्र नाचक्की झाली आहे.
No comments: