गरिबांना मिळत नाही रेती आणि तस्करांना उरली नाही भीती, रेतीच्या काळ्या बाजारामुळे भंगले सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न
प्रशांत चंदनखेडे वणी
महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेतीचा काळाबाजार जोमात सुरु असून वर्धा नदी पात्रातून नियमांना डावलून रेतीचे उत्खनन व अवैधरित्या रेतीची विक्री केली जात आहे. वणी हद्दीतील काही रेती घाटातून वाळू माफियांनी रेती चोरीचा सपाटाच लावला आहे. नियमांना तिलांजली देऊन रेती घाटातून रेतीचे उत्खनन करून अवैधरित्या रेतीची विक्री केली जात आहे. रेती घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु असतांना महसूल विभाग मात्र मुकदर्शक बनला आहे. दहा व बारा चाकी हायवा ट्रकांमधून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करून काळ्या बाजारात रेतीची सर्रास विक्री केली जात असतांना महसूल विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. शासनाची ऑनलाईन रेती विक्री प्रणाली तस्करांसाठीच अधिक लाभदायी ठरल्याचे दिसत आहे. रेती घाटांवर उभारण्यात आलेले डेपो रेती चोरीसाठी आणखीच अनुकूल ठरू लागले आहेत. रेती घाटातून वाहनांनी आणलेली रेती डेपोत साठविल्यानंतर ती ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना पुरविण्याचा शासनाचा नियम असतांना डेपो धारकांकडून नियमांना धाब्यावर बसविले जात आहे. अधिकृत रेती विक्रीला पूर्णपणे बगल देऊन अनधिकृतपणे रेती विक्री केली जात आहे. त्यामुळे तालुक्यात अनधिकृत रेती विक्रीला उधाण आले आहे. सर्वसामान्य नागरिक व घरकुल लाभार्थ्यांना नोंदणी करूनही रेती मिळत नाही तर इमारती बांधकामांच्या ठिकाणी रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा दिसून येत आहे. काळ्याबाजारात रेतीची विक्री करून तस्कर मालामाल होऊ लागले आहेत. तर रेती चोरीमुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडू लागला आहे. महसूल विभागाकडून रेती तस्करांसाठी रान मोकळे करून देण्यात आल्याचे दिसत आहे. रेती घाटांवर रात्रीचे खेळ सुरु असतांना महसूल विभाग मात्र झोपेचं सोंग घेऊन आहे. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी वाळू माफियांसमोर नांगी टाकल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
रेती चोरीला आळा बसावा म्हणून शासनाने ऑनलाईन रेती विक्रीचे धोरण अमलात आणले. ग्राहकांना शासकीय दरात रेती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन नोंदणी प्रणाली अमलात आणली. सेतू केंद्रांवरून रेती खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना शासकीय दरात रेती मिळणार असल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु नंतर शासकीय दरातच बदल करण्यात आले. शासनाकडून आधी ६०० रुपये प्रति ब्रास रेतीचा दर निश्चित करण्यात आला होता. परंतु आता अवाढव्य दर आकारण्यात येत आहे. त्यानंतरही कित्येक नोंदणी धारकांना अद्याप रेती मिळालेली नाही. एवढेच नाही तर घरकुल धारकांना मोफत रेती देण्यात येणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र घरकुल धारक अजूनही रेती मिळण्याची चातकासारखीच वाट बघत आहेत.
घरकुलाचा लाभ मिळाल्यानंतर अनेकांनी घराचे बांधकाम हाती घेतले. परंतु रेती अभावी अनेकांची घरकुलाची कामे अपूर्णच राहिली आहे. आता पावसाळा जवळ आला आहे. त्यामुळे घरकुलाच्या बांधकामासाठी घरे खोलून ठेवलेल्या लाभार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांचीही अशीच बिकट परिस्थिती आहे. काळ्या बाजारात अव्वाच्या सव्वा भावाने रेतीची विक्री केली जात असल्याने त्यांचेही घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना प्रतीक्षा व विना नोंदणी रेतीची मागणी करणाऱ्यांना सहजरित्या रेती मिळतांना दिसत आहे. त्यामुळे शासनाचे धोरण सर्वसामान्यांचे मरण करणारे ठरू लागले आहे. गरिबांना मिळत नाही रेती आणि चोरट्यांना उरली नाही भीती हे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
वणी हद्दीतील रेती घाटातून रेतीचा काळाबाजार सुरु असल्याची ओरड ऐकायला मिळत आहे. रेती घाटावर उभारण्यात आलेल्या डेपोवर कंत्राटदार आपला मालकीहक्क गाजवू लागले आहे. त्यांना केवळ घाटातून रेतीचे उत्खनन करून डेपोत रेतीचा साठा करणे, आणि रेतीसाठी ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना रेती पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राट देतांना काही नियम व अटी देखील बांधून देण्यात आल्या आहेत. डेपोत रेतीचा साठा करण्यापासून तर रेतीची वाहतूक करण्यापर्यंतचे नियम बांधून देण्यात आले असतांनाही डेपोधारकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. डेपोत रेती किती साठवायची तथा रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस लावावे, हा नियम असतांनाही त्याचे पालन केले जात नाही. मनुष्य बळातूनच रेतीचे उत्खनन करून रेतीचा साठा करण्याचा नियम असतांना या नियमाची देखील पायमल्ली केली जात आहे. ज्यांना रेती घाटाचे कंत्राट मिळाले ते स्वतःलाच मालक समजू लागले असून शासनाचे नियम ते धाब्यावर बसवू लागले आहेत.
महसूल विभागाचे अधिकारी मूग गिळून बसल्याने डेपो धारकांचे चांगलेच फावत आहे. घरकुल धारक व ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना निकृष्ट दर्जाची रेती पुरविण्यात येत आहे. तर चांगल्या प्रतीची रेती मनमानी किंमत आकारून काळ्या बाजारात विकली जात आहे. त्यामुळे रेतीचा काळाबाजार करणाऱ्यांच्या पाठीवर नेमका कुणाचा हात आहे, हा चर्चेचा विषय बनला आहे. रात्री कित्येक रेती भरलेले ट्रक घाटातून निघत असलत्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करून अवैधरित्या रेतीची विक्री केली जात आहे. आता तर दिवसाढवळ्याही रेतीचा काळाबाजार केला जात आहे. तेंव्हा रेती तस्करीच्या काळ्या धंद्यात गुंतलेल्यांच्या कुंडल्या तयार करून त्यांनी आजवर जमविलेल्या काळ्या धनाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तसेच घाटधारकांपुढे लोटांगण न घालता त्यांच्यावर कठोर कार्यवाही करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी देखील नागरिक करू लागले आहेत.
No comments: