प्रशांत चंदनखेडे वणी
शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरातील स्वस्तिक ऑइल मिल कंपनीत एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. कंपनीतील सरकीच्या ढिगाऱ्यात ही मुलगी तेथेच काम करणाऱ्या एका मजूर महिलेला मृतावस्थेत आढळून आली. कंपनीत मजुरांसाठी बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात कुटुंबासह वास्तव्यास असलेली ही अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिचा शोधाशोध सुरु असतांनाच काल ११ मे ला रात्री १० वाजताच्या सुमारास तिचा मृतदेहच आढळून आला. मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळून आल्याने तिचा घातपात तर झाला नसावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ओमवती तानसिंग धुर्वे (१०) असे या मृतावस्थेत आढळलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीची आई स्वतिक ऑइल मिलमध्ये काम करीत असल्याने त्याचं कुटुंबं कंपनीतीलच मजुरांच्या निवाऱ्यात वास्तव्यास असल्याचं समजते.
स्वस्तिक ऑइल मिल कंपनीतील मजुरांसाठी असलेल्या निवाऱ्यात कुटुंबासह वास्तव्यास असलेली अल्पवयीन मुलगी सरकीच्या ढिगाऱ्यात मृतावस्थेत आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही मुलगी निवाऱ्यातून अचानक बेपत्ता झाल्याने तिचा शोध घेतला जात असतांनाच काल रात्री तिचा मृतदेहच आढळून आला. कंपनीत काम करणाऱ्या मजूर महिलेला सरकीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह आढळून आल्याने विविध चर्चांना पेव फुटले आहे. तसेच संशयास्पद स्थितीत मुलीचा मृतदेह आढळल्याने तिचा घातपात तर झाला नसावा, असाही संशय व्यक्त केला जात आहे. मुलीची आई स्वस्तिक ऑइल मिलमध्येच कामाला असून वडील तानसिंग हे गवंडी काम करतात. त्यांना तीन मुली व एक मुलगा असून हे परप्रांतीय कुटुंबं कंपनीतीलच मजुरांच्या निवाऱ्यात वास्तव्यास होतं. त्यांची १० वर्षीय मुलगी राहत्या ठिकाणावरून अचानक बेपत्ता झाल्याने ते तिचा शोध घेत होते. परंतु कंपनीतीलच सरकीच्या ढिगाऱ्यात काल रात्री तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. योगेश ट्रेडर्सच्या गोदाम रखवालदाराच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसतांनाच ही रहस्यमय मृत्यूची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments: