प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील रेती घाटांवरून सर्रास वाळूची चोरी सुरु असून महसूल विभाग मात्र वाळू चोरी रोखण्यात असमर्थ ठरू लागला आहे. तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले असून रेती घाटांवर वाळू माफियांचा दबदबा पाहायला मिळत आहे. वाळू माफियांच्या दहशतीपुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. वाळूचा काळाबाजार सुरु असतांना प्रशासकीय अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काहीही करतांना दिसत नाही. त्यामुळे वणी तालुक्यात वाळू माफियाराज आल्याचं दिसत आहे. रेती घाटांवर तस्करांचे रात्रीचे खेळ चालतात. रेती घाटांवर रात्री बेसुमार रेतीचा उपसा करून चोरट्या मार्गाने रेतीची विक्री केली जाते. रात्री रेती घाटांवरून १० व १२ चाकी ट्रक बिनधास्त रेतीची वाहतूक करतांना दिसतात. अवैधरित्या रेतीचं उत्खनन करून दामदुप्पट किमतीने रेतीची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांना रेती खरेदी करणे अवघड झाले आहे. परिणामी त्यांचं हक्काचं घर बांधणंच कठीण झालं आहे. घरकुल लाभार्थ्यांनाही रेती मिळत नसल्याने त्यांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. घरकुलाच्या बांधकामासाठी विनामूल्य व त्वरित रेती उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय असतांना देखील त्याचं पालन होतांना दिसत नाही. घरकुल लाभार्थ्यांना मिळालीच तर निकृष्ट दर्जाची रेती मिळतांना दिसत आहे. त्यामुळे रेती डेपो उभारूनही प्रशासनाचं डेपोधारकांवर नियंत्रण न राहिल्याने रेती चोरीला आळा बसल्याचे दिसत नाही. रेती डेपोतूनच सर्रास रेतीचा काळा बाजार होत आहे. रेतीची ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना शासकीय दरात रेती मिळत नाही. तर बेकायदेशीर मार्गाने सहज रेती मिळतांना दिसत आहे. घाटधारक मनमानी भावाने अवैधरित्या रेतीची विक्री करीत असल्याने गोरगरिबांना रेती मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे रेती तस्करीवर रोख लावून सर्वसामान्यांना व घरकुलधारकांना शासनाच्या नियमानुसार रेती उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच व घरकुल लाभार्थ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यातील शिंदोला रेती घाटांकरिता उभारण्यात आलेल्या रेतो डेपोमध्येही हाच प्रकार सुरु असून येथूनही अवैधरित्या रेती विक्री केली जात आहे. शिंदोला रेती डेपो अंतर्गत येणाऱ्या रेती घाटांमध्ये रेतीचं अवैध उत्खनन करून ट्रकांमधून अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे. तसेच रेतीची दामदुप्पट किंमतीने काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. साखरा रेती घाटातून रात्री बिनधोक रेतीचं अवैध उत्खनन करून ट्रकांमधून रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे. उत्तम दर्जाची रेती काळ्या बाजारात विकली जात आहे. तर निकृष्ट रेती घरकुलधारकांना देण्यात येत आहे. शिंदोला रेती डेपोत निव्वळ निकृष्ट दर्जाची काही ब्रास रेती शिल्लक आहे. आणि चांगली रेती घाटातूनच ट्रकांमध्ये भरून अवैधरित्या विक्री केली जात आहे. वाळू माफियांनी रेती घाटांवर एकप्रकारे कब्जा केला असून प्रशासनाला न जुमानता ते रेतीचा काळाबाजार करीत आहे. महसूल विभाग केवळ मुकदर्शक बनला असून तस्करांवर कार्यवाही करण्यास महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणतांना दिसत आहे. रेतीच्या तस्करीमुळे गोरगरिबांचे घर बांधणे कठीण झाले आहे. घरकुलधारक अजूनही रेती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. रेती अभावी घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम थांबले आहे. त्यामुळे महसूल विभागाने रेतीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे सौजन्य दाखवून घरकुलधारकांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी सर्व ग्रामपंचायत सरपंच तथा घरकुल लाभार्थ्यांनी तहसीलदारांना व तालुका वाळू नियंत्रण समितीला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर मुंगोली ग्रामपंचायतीचे सरपंच गुणवंत ठाकरे, पुरडचे सरपंच ज्योतिष टोंगे, पिंपरीचे सरपंच तात्याजी पावडे तथा ढाकोरी सरपंच, केसुर्ली सरपंच, बोरी सरपंच व भुरकी ग्रामपंचायतीच्या सरपंचाची स्वाक्षरी आहे.
No comments: