विस दिवसांपासून नळाला पाणी नाही, नियमित पाणीकर भरूनही करावा लागतो पाणी टंचाईचा सामना
प्रशांत चंदनखेडे वणी
नगर पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शहरातील काही भागांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. २० ते २५ दिवस झाले तरी नळाला पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील गुरुनगर परिसरातील काही घरांना नळाद्वारे पाणी पुरवठाच होत नसल्याच्या तक्रारी नगर पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. नळाद्वारे पाणी येत नसल्याने येथील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नळ येत नसल्याच्या तक्रारी करूनही नगर पालिका प्रशासन मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे येथील रहिवाशांमधून कमालीचा रोष व्यक्त होतांना दिसत आहे. नियमित पाणीकर भरूनही अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिक कमालीचे संतापले आहेत. गुरूनगर परिसरातील हनुमान मंदिरासमोरील भागात नळाला पाणी येत नसल्याने याठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. या भागातील काही घरांना २० ते २५ दिवसांपासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. या भागातील पाण्याची समस्या त्वरित दूर न केल्यास नगर पालिकेसमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
गुरु नगर परिसरात मागील सहा महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. नळाद्वारे अनियमित व अनिश्चित पाणी पुरवठा होत असल्याने येथील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रात्री उशिरा या भागात पाणी पुरवठा केला जात असल्याने पाण्यासाठी येथील नागरिकांना रात्र काळी करावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. आता तर २० ते २५ दिवसांपासून नळाला पाणी येणंच बंद झालं आहे. नळाद्वारे पाणी येणं बंद झाल्याने येथील रहिवाशांना पाणी टंचाईला तोंड द्यावं लगत आहे. पाणी पुरवठ्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. त्यामुळे पाणी कर भरूनही येथील रहिवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नळाद्वारे नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने येथील रहिवाशांना नेहमी टँकरनेच पाणी खरेदी करावे लागते. नळाला पाणी येत नसल्याच्या कंत्राटदाराकडे तक्रारी करूनही कंत्राटदार आंधळे व बहिरेपणाचं सोंग घेत आहे. नगर पालिका प्रशासन कंत्राटदाराचे लाड पुरवत असल्याने कंत्राटदारा मनमानी कारभार सुरु आहे. नागरिकांच्या तक्रारी नंतरही पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्याची कंत्राटदाराने वेळेवर कधी तसदीच घेतली नाही. नगर पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गुरूनगर येथील पाणी पुरवठ्याची समस्या त्वरित दूर न केल्यास नगर पालिकेसमोरच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
Comments
Post a Comment