गोदाम रखवालदाराचा खून करणारे आरोपी अखेर पोलिसांना गवसले, विधी संघर्षग्रस्त बालकासह तीन मारेकऱ्यांना ठोकल्या बेड्या
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी मारेगाव मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ अगदीच रोडच्या बाजूला योगेश ट्रेडर्सचे सिमेंट स्टील गोदाम आहे. या गोदामात सळाखीचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आला आहे. या गोदामाचा रखवालदार म्हणून जीवन विठ्ठल झाडे (६०) रा. आष्टोना ता. राळेगाव हा मागील १० वर्षांपासून या ठिकाणी कामाला होता. तो पत्नीसह तेथेच राहायचा. २८ एप्रिलला अज्ञात दरोडेखोरांनी गोदामात दरोडा टाकून जीवन झाडे या राखलदाराची निर्घृण हत्या केली होती. २९ एप्रिलला सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी ४ सळाखीची बंडलं ( २४० किलो, किं. १४ हजार रुपये) देखील लंपास केल्याचे आढळून आले होते. आरोपींनी चोरी व खून केल्यानंतर घटनास्थळावर कुठलाही पुरावा सोडला नव्हता. गोदामातील ससीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. रखवालदाराच्या डोक्यावर व खांद्यावर लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते. परंतु तपासाला योग्य दिशा मात्र मिळत नव्हती. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. प्रत्येकच अँगलने तपास करण्यात आला. परंतु पोलिसांना धागेदोरे काही गवसत नव्हते. घटनेला बरेच दिवस लोटल्याने पोलिसांवर आरोपींचा शोध लावण्याचा दबाव वाढू लागला. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी एकूण पाच पथकं गठीत केली होती. पण आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
जिल्हा पोलिस अधीक्षक पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेऊन होते. एसडीपीओ गणेश किंद्रे हे स्वतः तपासकार्यात गुंतले होते. घटनास्थळापासून मारेगाव, नांदेपेरा रोड, मुकुटबन रोड, पळसोनी गाव, वरोरा रोड तथा घुग्गुस, शिरपूर व यवतमाळ रोडवरील तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून फुटेज मागविण्यात आले. सर्वच सीसीटीव्ही फुटेजची बाकाईने तपासणी करण्यात आली. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पदरित्या फिरतांना दिसलेले मालवाहू वाहन १४ मे ला वणी परिसरात आढळून आले. पोलिसांनी या मालवाहू वाहनाला ताब्यात घेत चालकाची कसून चौकशी केल्यानंतर या गुन्ह्याचे बिंग फुटले. टाटा कंपनीचे हे मालवाहू वाहन (MH ३७ २८५६) कारंजा लाड येथील रज्जाक शाह रमजान शाह याच्या मालकीचे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी शीघ्र कारंजा लाड येथे रवाना होऊन पुढील तपास केला. तेंव्हा त्यांना घटनेच्या दिवशी हे वाहन वणी परिसरात असल्याचे व या वाहनावर अजीम शहा रमजान शहा हा चालक असल्याचे समजले. तसेच त्यावेळी मोहम्मद उमर मोहम्मद गणी तथा एक विधी संघर्षग्रस्त बालक देखील वाहनावर सोबत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. पोलिसांनी या तिघांनाही अटक करून वणी पोलिस स्टेशनला आणले. त्यांनी सळाखीची बंडलं चोरी केल्याची व चोरीच्या आड येणाऱ्या रखवालदाराची लोखंडी रॉडने मारून हत्या केल्याची कबुली दिली आहे. अज्जू उर्फ अजीम शहा रमजान शहा याचे जुने टायर विक्री व भंगारचे दुकान असून त्याच्यावर नागपूरसह इतर पोलिस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्याने आधी वणी परिसरातच जुन्या टायरची चोरी केल्यानंतर गोदामात आपल्या साथीदारांसह दरोडा टाकला. तसेच चोरी करण्यास मज्जाव करणाऱ्या रखवालदाराची हत्या केली. या आवनात्मक खून प्रकरणाचा पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून मोठ्या शिताफीने या तीनही आरोपींना अटक केली आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, पोउनि बलराम झाडोकार, विराज गुल्हाने, सुदाम आसोरे, अश्विनी रायबोले, रामेश्वर कांडूरे, पोहेकॉ सुहास मंदावार, विकास धडसे, विजय वानखेडे, सुधीर पांडे, योगेश डगवार, पोना पंकज उंबरकर, अमोल अन्नेरवार, अविनाश बनकर, निलेश निमकर, पोकॉ शाम राठोड, विशाल गेडाम, मो. वसीम, रितेश भोयर, अमोल मुन्नेलवार, संतोष कालवेलवार, अतुल पायघन, अशोक दरेकर यांनी केली.
Comments
Post a Comment