भरदिवसा वाहन चालकाला रस्त्यात अडवून लुटले, किराणा मालाच्या वसुलीचे ८० हजार रुपये नेले लुटून
प्रशांत चंदनखेडे वणी
ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना किराणा माल पोहचवून वणीला परत येणाऱ्या वाहन चालकाला भरदिवसा रस्त्यात अडवून त्याच्या जवळील रोख रक्कम लुटल्याची खळबळजनक घटना १६ मे ला सायंकाळी ६.३० वाजता कोरंबी (मारेगाव) येथील जनता शाळेसमोर घडली. अज्ञात चार लुटारूंनी भररस्त्यात मालवाहू वाहन अडवून किराणा मालाच्या थकबाकी वसुलीतुन मिळालेले ८० हजार ७०० रुपये लुटले. तसेच वाहन चालकाचा मोबाईल हिसकावून त्यांनी दुचाकींवरून पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या लुटपातीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अज्ञात लुटारूंनी लुटपात केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील वाहेगुरू किराणा भंडार या दुकानातून ग्रामीण भागातील किराणा दुकरनदारांना किराणा मालाचा पुरवठा करण्यात येतो. राजेश तारुणा यांच्या मालकीचे हे किराणा दुकान असून ते मालवाहू वाहनातून चिल्लर विक्रेत्यांना किराणा माल पोहचवितात. १६ मे ला त्यांचा वाहन चालक जितेंद्र तुळशीराम रिंगोले (३२) हा किराणा माल भरलेले वाहन घेऊन ग्रामीण भागात माल पोहचविण्याकरिता गेला होता. वाहनावर मदतनीस म्हणून लक्षण मेश्राम हा देखील त्याच्या सोबत होता. घोन्सा, रासा व दहेगाव येथील दुकानांमध्ये किराणा माल देऊन जिंतेन्द्र हा वणीला परतत असतांना कोरंबी (मारेगाव) येथील जनता शाळेसमोर दुचाकीवरून आलेले चार जण त्याच्या वाहनाला आडवे झाले. त्यांनी वाहन चालकाला दमदाटी करीत त्याच्या जवळील पैशाची बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत किराणा मालाच्या थकबाकी वसुलीतून मिळालेली ८० हजार ७०० रुपयांची रोख रक्कम होती. लुटारूंनी पैशाची बॅग व चालकाचा मोबाईल हिसकावून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने वाहन चालक व मदतनीस कमालीचे भयभीत झाले. वाहन चालकाने घडलेल्या घटनेची माहिती आधी मालकाला दिली, व नंतर पोलिस स्टेशनला येऊन रीतसर तक्रार नोंदविली. जितेंद्र रिंगोले याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment