सात दिवसांत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेसमोरच तीव्र आंदोलन, काँग्रेसचे संजय खाडे यांचा इशारा

प्रशांत चंदनखेडे वणी 

नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरवासीयांना नागरी सुविधेसह विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. शहरात सध्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून पाण्याचे स्रोत मुबलक असतांनाही शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. पाणी पुरवठ्यातील अनियमिततेमुळे शहरवासीयांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही भागातील नळ एका आठवड्यांनी तर काही भागात नळच येत नसल्याने येथील रहिवाशांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर बोलवावे लागत आहे. सदोष पाणीपुरवठ्यामुळे शहरात पाण्याचा प्रश्न पेटला असून पाण्याच्या समस्येला घेऊन नागरिक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. शहरात निर्माण झालेली पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता काँग्रेसचे संजय खाडे यांनी नगर पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सात दिवसांच्या आत शहरातील पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेसमोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

शहरात पाण्याची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. शहरवासीयांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनियमित व अनिश्चित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासी वैतागले आहेत. शहरातील काही भागात आठवड्यातून एकदा नळ सोडले जातात. तर काही भागातील नळच येत नसल्याने नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नियमित पाणीकर भरूनही नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. काही भागात रात्री उशिरा नळ सोडले जातात. कधी नळ येतात तर कधी येतच नाही. मात्र नागरिकांना नळाच्या प्रतीक्षेत अख्खी रात्र जागून काढावी लागते. रात्री उशिरापर्यंत पाणी भरावं लागत असल्याने महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. पाण्याचा दाबही अतिशय कमी राहत असल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचत नाही. त्यामुळे काही भागातील नळांना पाणीच येत नसल्याची ओरड नेहमी ऐकायला मिळते. नगर पालिका प्रशासन पाणी पुरवठ्याची समस्या सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष करीत आहे. नगर पालिकेने पाणी करात वाढ केली. सक्तीने कर वसुलीही केली. मग पाण्याची समस्या सोडविण्यातही तेवढीच तत्परता का दाखवली जात नाही, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पाण्याच्या समस्येमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून ते नगर पालिकेविरुद्ध आक्रमक भूमिका घेण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत. शहरात निर्माण झालेल्या पाण्याच्या समस्येमुळे काँग्रेसचे संजय खाडे हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी नगर पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. येत्या सात दिवसांत शहरातील पाण्याची समस्या दूर करण्याचा अल्टिमेटमच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. सात दिवसांत पाण्याचा प्रश्न न सुटल्यास नगर पालिकेसमोरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

निवेदन देतांना राजाभाऊ पाथ्रडकर, साधना गोहोकर, शारदा ठाकरे, अशोक चिकटे, प्रेमनाथ नैताम, पीएस उपरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, क्रिष्णा पचारे, सुरेश बनसोड, लता भोंडाळे, मिनाक्षी रासेकर, पद्मा ताजणे, सारिका बोबडे, संगिता खाडे, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, ललिता बरशेट्टीवार, मंगला झिलपे, सविता रासेकर, अशोक पांडे, कैलास पचारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी