मालवाहू वाहनावरील हेल्परच निघाला लुटपातीच्या घटनेचा मास्टरमाईंड, पोलिसांनी हेल्परसह तिघांना केली अटक
प्रशांत चंदनखेडे वणी
मालवाहू वाहनाला भररस्त्यात अडवून चालकाजवळील रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून ५ दिवसांत या लुटपातीच्या घटनेचा छडा लावला आहे. मालवाहू वाहनावर जितेंद्र सोबत असलेला हेल्पर लक्ष्मण हाच विश्वासघातली निघाला असून त्यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही घटना घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. वणी येथील किराणा व्यवसायिकाच्या मालवाहू वाहनावर चालक व हेल्पर म्हणून काम करणारे दोघे जण ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना किराणा माल पोहचविण्याकरिता मालवाहू वाहन घेऊन गेले होते. यावेळी चालकाने काही किराणा दुकानदारांकडे असलेली थकबाकी देखील वसूल केली. त्यानंतर ते वणीला परतत असतांना घोन्सा मार्गावरील कोरंबी (मारेगाव) गावाजवळ अज्ञात लुटारूंनी रस्त्यात त्यांचे वाहन अडवून चालकाजवळील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून पळ काढला. १६ मे ला ही घटना घडली. त्यानंतर या घटनेची पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली. पोलिसांनी घटनेचा खोलात जाऊन तपास केला. शेवटी मालवाहू वाहनावरील मदतनीसच लुटपातीच्या घटनेचा सूत्रधार निघाला. किराणा व्यवसायिकाच्या नोकरानेच हा सिनेस्टाइल लुटपात घडवून आणल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा सूत्रधार असलेल्या हेल्परसह तीन आरोपींना अटक केली आहे
येथील किराणा व्यवसायिक राजेश तारुणा यांच्या वाहेगुरू या किराणा दुकानातून ग्रामीण भागातील किराणा दुकानदारांना मालवाहू वाहनाने किराणा माल पोहचविला जातो. ग्रामीण भागातील काही चिल्लर व्यवसायिक त्यांच्याकडून किराणा मागवितात. १६ मे ला त्यांच्या वाहनावर चालक असलेला जितेंद्र रिंगोले व हेल्पर लक्षण मेश्राम हे मालवाहू वाहन (तीन चाकी) घेऊन माल पोहचविण्याकरिता गेले होते. घोन्सा, दहेगाव व रासा तथा झरी तालुक्यातील काही दुकानदारांना माल पोहचविल्यानंतर चालक व हेल्पर हे वाहन घेऊन वणीला परतत असतांना दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार लुटारूंनी त्यांना कोरंबी (मारेगाव) येथील शाळेजवळ थांबविले. वाहन चालकाला धक्काबुक्की करीत किराणा मालाच्या थकबाकी वसुलीतून जमा झालेली ८० हजार ७०० रुपयांची रोख रक्कम व मोबाईल हिसकावून त्यांनी पळ काढला. अचानक घडलेल्या या लुटपातीच्या घटनेने चालक चांगलाच भयभीत झाला. भररस्त्यात वाहन अडवून लुटारूंनी पैशाची बॅग व मोबाईल हिसकावून नेल्याची माहिती चालकाने आधी मालकाला दिली, व नंतर पोलिस स्टेशनला येऊन रीतसर तक्रार नोंदविली. जितेंद्र रिंगोले याच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध लुटपातीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
भरदिवसा घडलेल्या या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. पोलिसांनी या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच चालक व हेल्पर यांचे कॉल डिटेल्स काढले. त्यात हेल्परने त्या दरम्यान केलेल्या कॉल वरून या घटनेचा छडा लागला. पोलिसांनी घटनेच्या दिवशी हेल्परने ज्यांना कॉल केले, त्यांची कसून चौकशी केली. तसेच हेल्परलाही पोलिसी खाक्या दाखविला. तेंव्हा हेल्पर हा पोपटासासारखा बोलू लागला. तसेच त्याच्या साथीदारांनीही गुन्ह्याची कबुली दिली. हेल्परने दिलेल्या माहितीवरून व त्याच्या सांगण्यावरूनच लुटपातीची घटना घडवून आणल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी कबुल केले आहे. पोलिसांनी राजेश तारुणा यांचा नोकर लक्ष्मण मेश्राम (२१) ह,मु. पंचशील नगर याच्यासह वैभव उर्फ कुणाल अमित निखाडे (१९) रा. इंदिरा चौक वणी, अभिषेक बळीराम मेश्राम (२१), राहुल सुनिल राजूरकर (२४) दोन्ही रा. नायगाव ता. वणी यांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (MH २९ BY २७६७) जप्त केली असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम १२०ब, ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्दर्शनात सपोनि दत्ता पेंडकर, बलराम झाडोकार करीत आहे.
Comments
Post a Comment