प्रशांत चंदनखेडे वणी
मारेगाव तालुक्यातील सिंदी (महागाव) येथील एका शेतकरी पुत्राने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २ मे ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राहुल गोविंदा काळे (३०) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विवंचना व नैराश्येतून युवावर्ग आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सिंदी (महागाव) येथे परिवारासोबत राहत असलेल्या राहुलने आपल्याच शेतात विषारी द्रव्य प्राशन करून जगाचा निरोप घेतला. राहुलचे वडील हे शेतकरी असून त्यांच्याकडे १.६२ हेक्टर शेती आहे. राहुल हा देखील वडिलांना शेतीत हातभार लावायचा. तसेच रोजमजुरीची कामे देखील करायचा. २ मे ला त्याने मानसिक तणावातून विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या केली. राहुल हा मजुरीला जातो म्हणून घरून निघाला. मात्र सायंकाळी ५ वाजता तो आपल्याच शेतात मृतावस्थेत आढळून आला. शेजारच्या शेतात काम करणाऱ्यांना तो निपचित पडून दिसल्याने त्यांनी ही माहिती राहुलच्या वडिलांना दिली. त्यांनी लगेच शेताकडे धाव घेतली. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. राहुलच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र घरातील कर्त्या मुलाने आत्मघात केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होतांना दिसत आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.
No comments: