प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील कायर या गावात विकासकामांना गती मिळाली असून गावातील अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे पूर्ण होतांना दिसत आहे. कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागेश धनकसार यांच्या प्रयत्नातून गावात विकासकामांची रेलचेल सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रलंबित असलेले रस्ते व नाल्यांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. गावातील वार्ड क्रमांक ३ मध्ये मागील ३५ वर्षांपासून सिमेंट रस्त्याच्या बांधकामाची मागणी केली जात होती. परंतु अनेक पंचवार्षिक उलटूनही या मुख्य रस्त्याच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात आलं नाही. मात्र नागेश धनकासार हे सरपंच झाल्यानंतर त्यांनी निधी खेचून आणत या रस्त्याचं बांधकाम पूर्ण केलं आहे. नागेश धनकसार यांनी गावातील विकासकामांना प्राधान्य देत गावकऱ्यांना सर्व सोइ सुविधा उपलब्ध देण्याला प्राथमिकता दिली आहे. गावातील रखडलेली कामे पूर्ण करण्याची त्यांची धडपड दिसून येत असून तसा त्यांनी एकाकी प्रयत्नही चालविला आहे.
कायर या गावाला पौराणिक वारसा लाभला असून तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून कायर हे गाव ओळखलं जातं. मात्र या गावात विकासकामांची मोठी वानवा होती. गावातील विकासकामे करण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आलं. गावकऱ्यांना सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याचेही सौजन्य दाखविण्यात आले नाही. गावातील रस्त्यांचे बांधकाम करण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. वार्ड क्रमांक ३ मधील बसस्थानक ते अंगणवाडी तसेच पेंदोर यांच्या घरापर्यंतचा रस्ता अनेक पंचवार्षिक उलटूनही कायम दुर्लक्षित राहिला. या रस्त्याने साधी सायकल चालविणेही कठीण झाले होते. या रस्त्यावर अनेक शाळा व महाविद्यालये तसेच अंगणवाडी व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा देखील आहेत. स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिनाला या शाळांमधून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली जाते. मात्र या रस्त्याची एवढी दुरावस्था झाली होती, की विद्यार्थ्यांना पायदळ चालणे देखील कठीण होऊन बसले होते. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असतांनाही या रस्त्याचे बांधकाम करण्याकडे कुणी लक्ष दिले नाही. परंतु नागेश धनकसार हे सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावातील विकासकामांना चालना दिली. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला वार्ड क्रमांक ३ मधील हा रस्ता त्यांनी गुळगुळीत केला. सरपंच झाल्यानंतर अल्पावधीतच नागेश धनकसार यांनी या मुख्य रस्त्याचे काँक्रेटीकरण करून या रस्त्याला नवीन रूप दिलं. त्यांनी गावातील विकासकामांना गती व गावकऱ्यांना सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिलेल्या विशेष निधीतून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. १ जानेवारीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते या रस्ता बांधकामाचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी माजी जी.प. सदस्या मंगला पावडे, माजी सभापती शिला विधाते, भाजप तालुकाध्यक्ष गजानन विधाते, सरपंच नागेश धनकसार, उपसरपंच माया मोहुर्ले व सर्व ग्रा.प. सदस्य उपस्थित होते. आज घडीला या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून या रस्त्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. तसेच वार्ड क्रमांक ३ मधील नालीचे बांधकाम देखील पूर्ण झाले आहे. नागेश धनकसार यांच्या कार्यकाळात गावातील विकासकामांना गती मिळाल्याने गाववासीयांमध्ये संतोष दिसून येत आहे. १४ महिन्याच्या आपल्या कार्यकाळातच सरपंच नागेश धनकसार यांनी गावात विकासकामांचा धडाका सुरु केला असून अनेक वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण केली आहेत.
No comments: