प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुक्यातील विरकुंड व बोर्डा या मार्गावर पूर्ववत एसटी महामंडळाची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला घेऊन विद्यार्थ्यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांची भेट घेतली. राजू उंबरकर यांनी लगेच विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांना आगार प्रमुखाची भेट घेण्यास सांगितले. फाल्गुन गोहोकार यांनी वणी आगार प्रमुखाचे कार्यालय गाठून विरकुंड व बोर्डा मार्गावर बस सेवा सुरु करण्याबाबत चर्चा केली. फाल्गुन गोहोकार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आगार प्रमुखांनी तात्काळ या मार्गावर एसटी बस सुरु केली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्याने शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे विरकुंड व बोर्डा मार्गावरील बस सेवा वणी आगाराकडून बंद करण्यात आली. एसटी बस बंद झाल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना या मार्गाने प्रवास करतांना मोठ्या अडचणी येऊ लागल्या. नागरिकांचे विरकुंड व बोर्डा मार्गाने प्रवास करणे कठीण झाले होते. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतामान वाढल्याने जीवाची लाई लाई होत असतांना विरकुंड व बोर्डा येथील विद्यार्थी व गाववासीयांना जोखीम पत्कारून खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता. क्षमतेपेक्षा जात प्रवासी कोंबून खाजगी वाहनधारक प्रवासी वाहतूक करतात. त्यातल्या त्यात उन्हाचा तडाखा, त्यामुळे खाजगी वाहनांनी प्रवास करणे त्रासदायक झाले होते. विद्यार्थ्यांना उन्हाळी वर्ग व शिकवणी वर्गाकरिता तसेच कास्तकारांना शेती उपयोगी वस्तूंच्या खरेदी करीता नेहमी वणीला यावं लागतं. परंतु एसटी बस अभावी त्यांना या मार्गाने प्रवास करतांना चांगल्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. विरकुंड व बोर्डा या गावांकडे जाण्याकरिता सुरु असलेली एसटी बस बंद करण्यात आल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थी व नागरिकांनी शेवटी राजू उंबरकर यांची भेट घेतली. त्यांनी मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. या मार्गावरील प्रवासाच्या समस्येविषयी राजू उंबरकर यांना अवगत केले. तसेच या मार्गावर पूर्ववत एसटी बस सुरु करण्यास सहकार्य करण्याची मागणी केली. राजू उंबरकर यांनी तात्काळ त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत फाल्गुन गोहोकार यांना आगार प्रमुखाची भेट घेण्यास सांगितले. फाल्गुन गोहोकार यांनी आगार प्रमुखाची भेट घेऊन त्यांच्याशी विरकुंड, बोर्डा मार्गावर पूर्ववत एसटी बस सुरु करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा केली. चर्चेनंतर आगार प्रमुखांनी लगेच या मार्गावर एसटी बस सुरु केली. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकाराने या मार्गावर पूर्ववत बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थी व गाववासीयांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
No comments: