Latest News

Latest News
Loading...

रखवालदाराची हत्या होऊन ७ दिवस लोटले, मारेकरी मात्र अद्यापही मोकाटच, पोलिसांना गवसलेच नाही धागेदोरे


 
प्रशांत चंदनखेडे वणी 

सिमेंट स्टील गोदामाची रखवाली करणाऱ्या वृद्धाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेला ७ दिवस लोटूनही अद्याप या खुन प्रकरणाचा उलगडा झालेला नाही. खुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिस प्रशासनाला अद्याप यश आले नसल्याने पोलिसांच्या तपास प्रणालीवरच प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. गोदामाची रखवाली करणाऱ्या वृद्धाची २८ एप्रिलला निर्घृण हत्या करण्यात आली. गोदामात दरोडा टाकून दरोडेखोरांनी रखवालदाराची हत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच गोदामाच्या आवारात ठेऊन असलेले सळाखीचे बंडलं देखील त्यांनी लंपास केले. त्यामुळे रखवालदाराचा दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच खून करण्यात आल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. परंतु रखवालदार पलंगावरच मृतावस्थेत आढळून आल्याने या खून प्रकरणाचा वेगळ्या अँगलनेही तपास केला जात आहे. वृद्धाच्या डोक्यावर व खांद्यावर वजनदार वस्तू मारण्यात आल्याने त्याचा अति रक्तस्त्रावाने मृत्यू झाला असावा, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. परंतु या दरोडा व खून प्रकरणात पोलिसांच्या हाती कुठलेच धागेदोरे न लागल्याने या खुनाचे गूढ अद्यापही कायम आहे. पोलिसांना तपासाची योग्य दिशाच मिळाली नसल्याने वृद्ध रखवालदाराचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत.

वणी पासून जवळच असलेल्या पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडरचे सिमेंट स्टील गोदाम आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात सळाखीचा साठा करून ठेवण्यात आला आहे. गोदामाची रखवाली करण्याकरिता एक वृद्ध दाम्पत्य ठेवण्यात आलं होतं. हे दाम्पत्य गोदामाजवळीच एका खोलीत राहायचं. वडकी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आष्टोना ता. राळेगाव येथील रहिवाशी असलेले जीवन विठ्ठल झाडे (६२) हे या गोदामाची रखवाली करायचे. मागील १० वर्षांपासून ते याठिकाणी कर्तव्यरत होते. त्यांची पत्नीही त्यांच्या सोबतच राहायची. २८ एप्रिलला पत्नी गावी गेली आणि नेमका त्याच दिवशी गोदामावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी गोदामातील सळाखीची बंडलं चोरून नेतांनाच वृद्ध रखवालदाराची निर्घृण हत्या केली. २९ एप्रिलला सकाळी ८ वाजता योगेश ट्रेडर्सचा दिवाणजी गोदामात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याने योगेश ट्रेडर्सचे मालक सुरेश खिवंसरा यांना घटनेची माहिती दिली. सुरेश खिवंसरा यांनी लगेच पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. 

या खुनाच्या घटनेला आता सात दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु खुनी मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. पोलिसांना या प्रकरणात कोणतीही लिंक मिळालेली नाही. पोलिसांच्या तपासाला योग्य दिशाच न मिळाल्याने या रहस्यमय घटनेवरून अजूनही पडदा हटलेला नाही. एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी यांनी या घटनेचा छडा लावण्याकरिता वणीसह शिरपूर व मुकुटबन येथीलही पोलिस यंत्रणेला अलर्ट केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी देखील वणी पोलिस स्टेशनला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. परंतु तपासाला मात्र अद्याप निर्णायक वळण मिळालेलं नाही. वणी तालुक्याला हादरवून सोडणारी ही घटना असून या घटनेचा लवकरात लवकर उलगडा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

वणी पोलिस स्टेशन हद्दीत गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला असून घरफोडी, चोरी व दरोड्यांचा घटना वाढू लागल्या आहेत. दुचाकी चोरीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीत होत असलेली वाढ आता चिंतेची बाब बनली आहे. गुन्हेगारी कारवाया वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून शस्त्राच्या धाकावर घरातील ऐवज लुटला जात आहे. आता तर चोरट्यांच्या हिंमती एवढ्या वाढल्या की, चोरीच्या आड येणाऱ्यांना यमसदनी धाडण्यासही ते मागेपुढे बघत नाही. चोरट्यांना पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधीच पटवारी कॉलनी येथील एका घरावर दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणाचा अद्यापही छडा लागला नसून पोलिसांचे हात दरोडेखोरांच्या मानगुटी पर्यंत पोहचू शकले नाहीत. कित्येक चोरी व घरफोडीच्या घटनांचा अद्याप उलगडा झालेला नाही. चोरटे अजून पोलिसांच्या आवाक्याबाहेरच आहेत. एका मागून एक चोरीच्या घटना घडवून आणत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. 

चोरी, घरफोडी व दरोड्यांबरोबरच आता खुनाच्या घटनाही घडू लागल्या आहेत. परंतु गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येतांना दिसत नाही. पोलिसांमध्ये तपास कौशल्याचा अभाव दिसून येत आहे. गुन्हे शोध पथकही नावालाच उरले आहे. यातील काही जण तर वसुलीच्या कामातच व्यस्त असतात.  कित्येक पोलिसांनी आपली कारकीर्द वणी पोलिस स्टेशमध्येच घालविली आहे. अनेक वर्षांपासून काही पोलिसांच्या बदल्याच न झाल्याने त्यांचे प्रत्येकच क्षेत्रातील लोकांशी हितसंबंध निर्माण झाले आहेत. काही पोलिस आलटून पालटून वणी पोलिस स्टेशनलाच बदली करून घेत आहेत. वैभव जाधव ठाणेदार असतांना गुन्हे शोध पथक पूर्णतः ऍक्टिव्ह होतं. त्यावेळी गंभीर गुन्हांचा छडाही त्वरित लागायचा. डीबी पथकाचं गुन्हेगारी क्षेत्रावर बारीक लक्ष असायचं. गुन्हेगारी क्षेत्रावर त्यांनी वचक निर्माण केली होती. 

परंतु नंतरच्या काळात पोलिसांच्या कार्यवाहीची गती मंदावली. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणही कमी झाले. डीबी पथकाचा गुन्हेगारांवर वचकच उरला नाही. कारण त्यांचे दोस्ताने वाढले आहेत. त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत असून त्यांचे आपसातच खटके उडतांना दिसतात. तर्कशुद्ध तपास व योग्य नेटवर्क नसल्याने गुन्हेगारांचा शोध लावण्यात पोलिसांना यश येतांना दिसत नाही. वणी पोलिस स्टेशन हे अति संवेदनशील असतांनाही अधिकारी वर्गात बाणेदारपणा दिसत नाही. पोलिस अधिकाऱ्यांचा रुबाबच पडत नसल्याने गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरतांना दिसत नाही. गुन्हेगारी क्षेत्रात होत असलेली वाढ चिंताजनक असून यावर वेळीच नियंत्रण मिळविले नाही तर वणीला यवतमाळ बनायला वेळ लागणार नाही, अशा खुल्या चर्चा आता शहरातून ऐकायला मिळत आहे. अपराधीक घडामोडी वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांना हुडकून काढत त्यांना पोलिसी खाक्या दाखविणे गरजेचे झाले आहे. 

आता शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर लागणार सीसीटीव्ही कॅमेरे 
वणी शहरासह तालुक्यात गंभीर स्वरूपाच्या घटना घडू लागल्याने पोलिस प्रशासनाने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला असून लवकरच शहरातील प्रमुख चौकांमध्ये व मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. मागील काही दिवसांत गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. शहरासह तालुक्यात घरफोडी व चोरीचे सत्रच सुरु झाले आहे. नागरिकांच्या किंमती वस्तूंवर चोरटे डल्ला मारू लागले आहेत. नागरिकांच्या दुचाक्या तसेच चारचाकी वाहनेही लंपास करू लागले आहेत. दिवसाढवळ्या घरफोडी व चोरी करण्याइतपत चोरट्यांच्या हिंमती वाढल्या आहेत. राहत्या घरी दरोडा टाकून लाखोंचा मुद्देमाल पळविला जात आहे. त्यामुळे हे दरोडेखोर व भुरटे चोर कुठे तरी कॅमेऱ्यात कैद व्हावे या दृष्टिकोनातून हा सुरक्षिततेचा उपाय केला जात आहे. चोरटे आता चांगलेच शातीर झाले असून चोरी करतांना ते तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करू लागले आहेत. त्यामुळे आता शहरात ठिकठिकाणीच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा हा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. 




No comments:

Powered by Blogger.