अखेर, महसूल अधिकाऱ्यांना कार्यवाहीचा मुहूर्त सापडला, रेती घाटावरून तीन हायवा ट्रक घेतले ताब्यात
प्रशांत चंदनखेडे वणी
वाळू तस्करीला उधाण आल्याने २० मे पासून तालुक्यातील रेती घाट बंद करण्यात आले आहेत. वाळू तस्करीला लगाम लागावा म्हणून रेती घाटांवर रेती डेपो उभारण्यात आले. ऑनलाईन रेती खरेदीचे धोरण शासनाने अमलात आणले. सेतू केंद्रावरून ऑनलाईन नोंदणी केल्यास शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु नोंदणी धारकांना प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीच मिळाले नाही. आणि मिळालीच तर निकृष्ट दर्जाची रेती मिळाली. चांगल्या दर्जाची रेती ऑफलाईन पद्धतीनेच नागरिकांना खरेदी करावी लागली. अतिशय कमी दरात रेती घाटाचे (उत्खनन, साठवणूक व वाहतूक) कंत्राट घेण्यात आले. रेती डेपोच्या आडून रेतीचा काळाबाजार करण्यात आला. अवैध रेती विक्रीला तालुक्यात अक्षरशः उधाण आले. दिवसरात्र रेती घाटातून रेतीची अवैध वाहतूक होऊ लागली. काळ्या बाजारात मनमानी दर आकारून रेतीची विक्री करण्यात आली. सामाजिक, राजकीय क्षेत्रांबरोबरच लोकप्रतिनिधी व नागरिकांमधून देखील रेती तस्करीला रोख लावण्याची मागणी करण्यात आली. पण महसूल प्रशासनाने मात्र झोपेचं सोंग घेतलं होतं. घरकुलधारकांना रेती न मिळाल्याने त्यांची घरकुलाची कामे रखडली. सर्वसामान्य जनतेला काळ्याबाजारातून रेती खरेदी शक्य न झाल्याने त्यांचे घराचे स्वप्न भंगले. वाळू माफिया शिरजोर होऊन रेतीची अवैध विक्री करीत असतांना महसूल विभाग मात्र उघड्या डोळ्याने बघण्यापलीकडे काहीही करतांना दिसत नव्हता. रेतीचा काळाबाजार करून वाळू माफिया मालामाल झाले. त्यांनी रेती तस्करीतून अमाप माया गोळा केली. पण शिंतोडे कुठे कुठे उडाले हे सर्वांनाच ठाऊक आहे. तस्करांनी शासनाचा महसूल गिळंकृत केला, कारण महसूल विभाग त्यांच्या दावणीला बांधला गेला होता. परंतु आता महसूल विभाग कुंभकरणी झोपेतून जागा झाल्याचे दिसत आहे. वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याचं धाडस अधिकारी दाखवू लागले आहेत. त्यामुळे खरोखर वाळू चोरीवर निर्बंध लावण्यास महसूल विभाग सरसावला आहे, की अर्थपूर्ण संबंध बिघडल्याने ही कार्यवाही करण्यात आली, ही चर्चा शहरात रंगली आहे.
अहेरी (बोरगाव) रेती घाटावरून वाळूची चोरी होत असल्याच्या माहिती वरून मंडळ अधिकारी देशपांडे तथा तलाठी इंगोले व पाचभाई या महसूल विभागाच्या पथकाने मध्यरात्री रेती घाटावर धाड टाकली. त्याठिकाणी त्यांना तीन हायवा ट्रक आढळून आले. त्यांनी ही माहिती नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांना दिली. नायब तहसीलदार पोलिसांना घेऊन अहेरी (बोरगाव) रेती घाटावर पोहचले. महसूल अधिकारी रेती घाटावर आल्याचा सुगावा लागताच दोन ट्रक चालकांनी घाटावरच रेती खाली करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण अधिकाऱ्यांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. रेती खाली करून पळ काढण्याच्या तयारीत असलेले दोन्ही ट्रक महसूल पथकाने ताब्यात घेतले. एक ट्रक मात्र रेती भरलेल्या अवस्थेतच पथकाच्या हाती लागला. रेती भरलेला (५ ब्रास) १२ चाकी ट्रक (MH ४० BG ०१९८) व रेती खाली केलेले दोन १० चाकी ट्रक (MH ४० CT ३७४२, MH ३४ BG ९०९४) महसूल विभागाने ताब्यात घेऊन तहसीलपुढे लावले. रेती घाटावरून अवैधरित्या रेतीची वाहतूक करून रेती काळ्या बाजारात विकली जात असल्याचे या कार्यवाहीने उघड झाले आहे. महसूल अधिकाऱ्यांनी मध्यरात्री रेती घाटावर जाऊन रेती चोरी करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही केल्याने महसूल विभाग खरच ऍक्टिव्ह मोडवर आला, की कारण काही वेगळेच आहे या चर्चेला शहरात उधाण आले आहे.
Comments
Post a Comment