मनसेने उचलला उपचाराचा खर्च, आणि अत्यवस्थ अवस्थेतील आदित्य झाला ठणठणीत बरा
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील रामपुरा येथे कुटुंबासह राहत असलेल्या आदित्य देठे या तरुणाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मेंदूला इजा झाली होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्याचा मेंदू निकामी होण्याची व त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची शक्यता वर्तविली होती. त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेला लाखो रुपयांचा खर्च येणार होता. प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणारं हे कुटुंबं उपचाराचा एवढा खर्च उचलू शकत नव्हतं. उपचाराअभावी पोटच्या गोळ्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवू नये, ही विवंचना कुटुंबाला लागली होती. मुलाची जीवन मृत्यूशी झुंज सुरु होती. तर मुलाची अवस्था पाहून आई वडिलांचं काळीज फाटत होतं. अशातच रामपूरा येथील नागरिकांनी नेहमी मदतीला धावणाऱ्या राजू उंबरकर यांची भेट घेतली. त्यांनी राजू उंबरकर यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली. राजू उंबरकर यांनी क्षणभरही विचार न करता तरुणाच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविली. त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधत उपचाराला लागणाऱ्या खर्चाचीही पूर्तता केली. राजू उंबरकर यांनी उपचाराचा पूर्ण खर्च उचलल्याने तरुणाला योग्य उपचार मिळाले, व अत्यवस्थ अवस्थेत असलेला तरुण ठणठणीत बरा झाला. राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे आदित्य हा गंभीर अवस्थेतून सुखरूप परतल्याने कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगले तर उद्याचे भविष्य असलेला तरुण ठणठणीत बरा झाल्याने राजू उंबरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. राजू उंबरकर यांच्या मदतीमुळे एका अपघातग्रस्त तरुणाला नवजीवन मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment