उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न झाले कमी, संजय खाडे यांनी शेतकऱ्यांच्या मांडल्या व्यथा, बी-बियाण्यांच्या किंमती कमी करण्याची केली मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
सन २०२२-२०२३ या कालावधी करीता शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कम अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतीच्या या हंगामाचा यिल्डबेस पीकविमा सरसकट मंजूर झालेला असतांनाही काही शेतकरी मात्र पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्याचप्रमाणे सन २०२३-२०२४ या हंगामातीलही पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. किंबहुना ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली ती अत्यंत कमी आहे. त्यामुळे जे शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम तात्काळ जमा करावी. तसेच किती शेतकरी पीक विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहिले, त्यांची यादी जाहीर करावी, या मागणीसह बी-बियाणे व खतांच्या गगनाला भिडलेल्या किंमती जमिनीवर आणण्याची मागणी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अवघ्या काही दिवसांतच शेतीचा नवीन हंगाम सुरु होणार आहे. शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. पण तो आर्थिक विवंचनेतही अडकला आहे. मागील हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारली, तर नंतर अतिवृष्टी व आता झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं पार कंबरडं मोडलं आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात आलं. कसा बसा हाती आलेल्या शेतमालालाही अत्यल्प भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात आला आहे. तेंव्हा आता शेतकऱ्यांवरील आर्थिक बर्डन कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बी-बियाणे व खतांच्या किंमती कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे बी-बियाणे व खतांच्या किंमती कमी करून शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी संजय खाडे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून केली आहे.
निवेदन देतांना प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर, तेजराज बोढे, संदीप ढेंगळे, अक्षय कुचनकर, प्रशांत जुमनाके, आकाश टेकाम, उमेश कोसारकर, सिताराम झाडे, वेदांत चाफले, विजय ढेंगळे, अरुण नागपुरे, प्रतिक गेडाम, अनुराग गायकवाड, अनिकेत गंधारे, कैलास पचारे, भारत डंभारे, मनोज भगत, भास्कर वासेकर, यादव आसुटकर, विकेश पानघाटे, ईश्वर खाडे, अशोक पांडे, अरुण चटप, काजल शेख, करण आसुटकर, गणपत कोसारकर, शालिक काथवटे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment