शेतीच्या वादातून दिर व नणंदेची भावजयीला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी
वडिलोपर्जित शेतीचा सुरु असलेला वाद विकोपाला गेला आणि प्रकरण मारहाणीपर्यंत पोहचले. दिराने घराशेजारी राहणाऱ्या आपल्या भावजयीला व तिच्या मुलांना शिवीगाळ व दमदाटी करीत काठीने जबर मारहाण केली. एवढेच नाही तर वडिलांची शेती हडप करण्याचा प्रयत्न केल्यास बघून घेण्याची धमकी देखील दिली. दिराबरोबरच दिराची पत्नी, नणंद व नणंदेच्या मुलाने देखील तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार महिलेने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी दीर व नणंदेसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील सुकणेगाव येथे राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित शेतीचा सुरु असलेला वाद हाणामारीपर्यंत पोहचला. लहान भाऊ व बहिणीने आपल्या भावजयीला व तिच्या मुलांना थापड, बुक्क्या व काठीने जबर मारहाण केली. डोक्यावर काठी मारण्यात आल्याने महिलेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. १४ मे ला घडलेल्या या घटनेची तक्रार काल ३० मे ला पोलिस स्टेशनला नोंदविण्यात आली. प्रतिभा बंडू बोढाले ही महिला सुकणेगाव येथे आपल्या परिवारासह राहते. तिचे सासरे महादेव हरबाजी बोढाले (84) हे देखील त्यांच्या सोबतच राहतात. महिलेचा दिरही त्यांच्या घराशेजारी राहतो. प्रतिभा बोढाले व त्यांचा मुलगा वडिलांचा सांभाळ करीत असल्याने वडिल पुतण्याच्या नावावर तर शेती करणार नाही ना, या कारणावरून दोन कुटुंबामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. 14 मे ला हा वाद विकोपाला गेला. दीर व नणंदेने शेतीचा वाद उकरून काढत भावजयीला व तिच्या मुलांना मारहाण केली. दीर राजू महादेव बोढाले (36) जाऊ सुषमा राजू बोढाले (30), नणंद माया बबन वैद्य (40) व नणंदेचा मुलगा नितेश बबन वैद्य (24) या चौघांनी मिळून प्रतिभा बंडू बोढाले व तिच्या मुलामुलीला शिवीगाळ व दमदाटी करीत जबर मारहाण केली. या चौघांनी केलेल्या मारहाणीबाबत प्रतिभा बोढाले यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली असून पोलिसांनी चौघांवरही भादंवि च्या कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बिट जमादार संतोष अढाव करीत आहे.
Comments
Post a Comment