बापरे...! अतिक्रमणाला अडथळा होऊ नये म्हणून चक्क झाडच तोडले

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरात अतिक्रमण वाढत असतांना नगर पालिका प्रशासन मात्र मवाळ भूमिका घेतांना दिसत आहे. शहरातील प्रमुख रस्त्याच्या कडेला अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटली असून खुल्या जागांवर कब्जा केला आहे. अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत. नगर पालिका लाखो रुपये खर्चून अतिक्रमण हटाव मोहीम राबविते. मात्र कालांतराने अतिक्रमण जैसे थे च होते. वणी वरोरा या मुख्य मार्गाच्या काँक्रेटीकरणाचे काम सुरु करण्यापूर्वी या मार्गावरील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले होते. नगर पालिकेने या निमित्ताने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून प्रमुख व अंतर्गत रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण हटविले होते. मात्र आता वणी वरोरा मार्गाच्या कॉंक्रेटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मार्गालगत काँक्रेटचीच भूमिगत नाली बांधण्यात आली आहे. या नालीवर अतिक्रमण करण्याचा सपाटाच सुरु झाला असून नालीवर दुकाने लावण्याची स्पर्धा पहायला मिळत आहे. अतिक्रमणाला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चक्क वृक्ष तोडली जात आहे. काँक्रेट नालीवरील एका अतिक्रमित दुकानासमोरील विशाल वृक्षच तोडण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अतिक्रमणधारक एवढे निडर झाले आहेत की, त्यांना वन विभाग व नगर पालिकेची जराही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. अतिक्रमित दुकानासमोरील झाड तोडून न.प. व वन प्रशासनाला एक प्रकारे आव्हान देण्यात आले आहे. शासन लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण मोहीम राबविते. परंतु विशाल वृक्षांची अशा प्रकारे कत्तल होत असतांना वन विभाग मात्र मूग गिळून चूप बसत असल्याने ही मोहिम राबविण्याला अर्थच काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

धूळ प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेला हा तालुका असून प्रदूषण नियंत्रित रहावं म्हणून तालुक्यात दरवर्षी रुक्ष लागवड करण्यात येते. शासनाकडून रुक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्च केले जातात. पर्वावरणाचं संतुलन टिकवून ठेवण्याकरिता वृक्ष लागवड केली जाते. नैसर्गिक वातावरण निर्माण व्हावं म्हणून वृक्षांचं संवर्धन करणं गरजेचं असतांना सर्रास वृक्षांची कत्तल केली जात आहे. वन विभाग व नगर परिषद प्रशासनाला न जुमानता अतिक्रमणाला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चक्क मुख्य मार्गावरील झाडच तोडण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी तहसील समोर व वन विभागापासून काही अंतरावरच हा प्रकार घडला. त्यामुळे वन विभागाची परवानगी घेऊन झाड तोडले की विना परवानगीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र नालीवर अतिक्रमण करून थाटलेल्या दुकानासमोर झाड येत असल्याने हे झाड तोडण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. 

मुख्य रस्त्यावरील विशाल वृक्ष तोडण्याइतपत अतिक्रमण धारकांच्या हिंमती होत असल्याने त्यांना पाठबळ कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशाल वृक्षांची कत्तल केली जात असतांना वन विभाग चुप्पी साधत असल्याने वन अधिकारी दबाखाली येऊन तर दुर्लक्ष करीत नाही ना, अशीही चर्चा रंगू लागली आहे. वृक्ष संवर्धनाचे पाठ गिरविणारी व झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देणारी नगर परिषदही विशाल वृक्षाची कत्तल होऊनही कुंभकर्णी झोपेत आहे, याला काय म्हणावे हेच कळत नाही. एका मोठ्या झाडाची कत्तल झाल्याने पर्यावरण प्रेमींमधून मात्र नाराजी व्यक्त होतांना दिसत आहे. अतिक्रमण करणाऱ्यांकडून परिणामांची पर्वा न करता चक्क वृक्षाची कत्तल केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावर आता वन विभाग व नगर पालिका प्रशासन काय कार्यवाही करते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी