सहारा पार्क येथील घरफोडीचे तार नागपूरशी जुळले, नागपूर येथील चोरट्यांनी वणीत घर फोडले
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी नांदेपेरा मार्गावरील सहारा पार्क येथे भरदिवसा घरफोडी करणारे चोरटे तीन महिन्यानंतर पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध लावून त्यांना अटक केली आहे. हे दोनही अट्टल चोरटे नागपूर येथील रहिवाशी असून ते चोरीच्या गुन्ह्यातच नागपूर व भंडारा तुरंगात शिक्षा भोगत होते. त्यांना वणी पोलिसांनी न्यायालयीन परवानगीने ताब्यात घेऊन येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता वणी पोलिस स्टेशनला आणले आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडीया (२९) व पंकज श्रावण खोकरे (३१) दोघेही रा. हुडकेश्वर नागपूर अशी या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अट्टल चोरट्यांनी नावे आहेत. पळसोनी फाट्यावरील गोदाम रखवालदाराच्या खुनाचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी घरफोडीच्या घटनेचा छडा लावल्याने पोलिस अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पटवारी कॉलनी येथे राहत्या घरी पडलेल्या दरोड्याचाही पोलिस पर्दाफाश करतील काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहारा पार्क येथे कुटुंबासह राहत असलेल्या शंकर किसन घुग्गुल यांच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. सोन्याची ४ तोळ्याची पोत व रोख ५ हजार रुपये असा एकूण १ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला होता. शंकर घुग्गुल हे शिक्षक असून त्यांची पत्नी नर्स आहे. पती व पत्नी दोघेही कर्तव्यावर गेल्यानंतर चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, व घरातील लोखंडी कपाटात ठेऊन असलेली सोन्याची पोत व रोख रक्कम लंपास केली. दुपारी त्यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे दार सताड खुले दिसले. त्यामुळे शेजाऱ्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी शंकर घुग्गुल यांना फोन करून त्यांच्या घराचा दरवाजा खुला असल्याची माहिती दिली. शंकर घुग्गुल यांनी घरी येऊन बघितले तर त्यांना घरी चोरी झाल्याचे दिसून आले. घरातील कपाटात ठेऊन असलेली सोन्याची पोत व रोख ५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. भरदिवसा चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्याने शंकर घुग्गुल यांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला येऊन घरफोडीची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला.
८ फेब्रुवारीला ही घरफोडीची घटना घडली. त्यांनतर पोलिसांनी तब्बल तीन महिन्यानंतर आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळापासूनचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासण्यात आले. यात दोन दुचाकीस्वार संशयास्पदरित्या घटनास्थळापासून नागपूरच्या दिशेने जातांना दिसले. त्यामुळे नागपूर महामार्गावरील सर्वच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. बुटी बोरी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये दिसू नये म्हणून चोरट्यांनी आड मार्ग निवडला. त्यामुळे टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत त्यांचे चेहरे दिसू शकले नाही. परंतु मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नागपूर येथे जाऊन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही फुटेजची प्रिंट काढून नागपूर पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला असता ते नागपूर येथीलच रहिवाशी असल्याचे समोर आले. ते दोघेही अट्टल चोरटे असल्याचे नागपूर पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यातील एक जण नागपूर तुरुंगात तर दुसरा भंडारा तुरंगात असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.
त्यानंतर गुन्हे शोध पथकाने न्यायालयाची परवानगी घेऊन दोनही आरोपींना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता ताब्यात घेतले, व वणी पोलिस स्टेशनला आणले. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान त्यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले. चोरी केलेले दागिने त्यांनी नागपूर येथीलच सराफा विक्रेत्याकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या सराफा दुकानदाराकडे जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता दुकानदाराने बरेच दिवस होऊनही दागिने सोडविण्यात न आल्याने दागिने गलविल्याचे सांगितले. दागिने वितळवून तयार केलेली सोन्याची पट्टी दुकानदाराने पोलिसांच्या स्वाधीन केली. ३४.८२० ग्राम व ७.६ सेमी लांब सोन्याची पट्टी पोलिसांनी ताब्यात घेतली असून आजच्या बाजारभावाप्रमाणे तिची किंमत २ लाख ३८ हजार १६८ रुपये आहे. पोलिसांनी दोनही चोरट्यांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून वणी पोलिस स्टेशन हद्दीतील आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येतात काय, याकरिता त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल बेहेरानी, सपोनि दत्ता पेंडकर, डीबी पथक प्रमुख बलराम झाडोकार, सपोनि सुदाम आसोरे, डीबी पथकाचे विकास धडसे, पंकज उंबरकर, मो. वसीम, शाम राठोड, विशाल गेडाम, भानू हेपट, विकास ब्राह्मणे यांनी केली. पुढील तपस गुन्हे शोध पथकाचे सपोनि बलराम झाडोकार करीत आहे.
Comments
Post a Comment