वैशाखी पौर्णिमेला घडला हा इतिहास, विश्व तारण्या महामानव बुद्ध आले जन्मास, रेल्वे स्टेशन येथे बुद्ध जयंती साजरी
प्रशांत चंदनखेडे वणी
जगाला करुणा व शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज वणी शहर व तालुक्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध यांचा जन्म झाला. वैशाख पौर्णिमेलाच त्यांना ज्ञान प्राप्ती होऊन ते सम्यक सम्बुद्ध झाले. आणि वैशाख पौर्णिमेलाच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनापासून तर मृत्यू पर्यंतच्या प्रवासात वैशाख पौर्णिमेचं महत्व फार दिसून येतं. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असंही संबोधलं जातं. बुद्ध जयंतीचा मंगलमय सोहळा "त्रिविध बुद्ध पौर्णिमा" म्हणून जगभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतातही बुद्ध जयंती उत्साहात साजरी केली जाते, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुद्ध जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. बुद्ध जयंती निमित्त पंचशील झेंड्याजवळ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मध्य रेल्वे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व मध्य रेल्वे कर्मचारी रेल्वे स्टेशन वणी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचशील झेंड्याजवळ बुद्ध जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. मागील ३० ते ३५ वर्षांपासून पंचशील झेंड्याजवळ बुद्ध भीम जयंतीचे कार्यक्रम अखंडितपणे घेण्यात येत आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन, संविधान दिन व महापरिनिर्वाण दिनाचेही कार्यक्रम घेण्यात येतात. रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी पंचशील झेंडा उभारल्यानंतर नवीन पिढीनेही तेवढ्याच उत्साहाने कार्यक्रम घेतले आहेत. आज बुद्ध जयंती निमित्त पंचशील झेंड्यावर उत्साहपूर्वक कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अल्पोपहारचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी बुद्ध धम्मावर आपले विचार व्यक्त केले. तर काही महिलांनी सुरेख आवाजात बुद्ध गीते गायली. बुद्धाचं तत्त्वज्ञानच जगाला तारू शकतं, हा संदेश बुद्ध जयंतीच्या या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाला रेल्वे कर्मचारी संतोष गरपाल, रेल्वे विभागात कार्यरत असलेले अविनाश बोरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे प्रशांत चंदनखेडे, राहुल चंदनखेडे, रंजना चंदनखेडे, रविना चंदनखेडे, मायाताई चंदनखेडे, मंजुळाबाई पाटील, मिराताई धवन, शशिकला बोरकर, इंदू पळवेकर, रेखा पाझारे तसेच विठ्ठलवाडी येथील रेखा तेलंग, सुरेखा गजभिये, प्रणाली पाटील, फुलझेले यांच्यासह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.
तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म नेपाळच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या लुम्बिनी वनात ख्रिस्त पूर्व ५६३ साली आई महामाया यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील शुद्धोधन हे राजा होते. बिहार प्रांतातील फल्गु नदीच्या तिरावर वसलेल्या गया येथे सिद्धार्थ गौतमाला सम्यक सम्बोधी प्राप्त झाली. आणि त्यानंतर ते बुद्ध म्हणून नावारूपास आले. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील शालवृक्षाखाली त्यांचे महापरिनिर्वाण झाले. वैशाख पौर्णिमेलाच हा घटनाक्रम घडला. त्यामुळे बौद्ध जगतात बुद्ध जयंतीचा मंगलमय सोहळा "त्रिविध बुद्ध पौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती २ मे १९५० रोजी नवी दिल्ली येथे प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. या समारंभाला अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खुसंघ व हजारोच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते. १९५६ पर्यंत बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे कार्यक्रम पार पडले. म्हणूनच त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रवर्तक म्हटले जाते.
दिल्ली व्यतेरिक्त महाराष्ट्रातही १९५३ पासून बुद्ध जयंतीची सुरुवात झाली. इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सार्वजनिक सुट्टी मिळते. मग करुणा आणि शांतीचा महान संदेश देणाऱ्या बुद्धांच्या जयंती दिनीच सुट्टी का नाही ? हा प्रश्न त्यावेळी बाबासाहेबांनी उपस्थित केला होता. एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक वाढून द्या, अशी आग्रही मागणी बाबासाहेबांनी १९४२ साली तत्कालीन गृहमंत्र्यांकडे केली होती. त्यांच्याच प्रयत्नांमुळे २७ मे १९५३ ला बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. २४ मे १९५६ रोजी बाबासाहेबांनी मुंबईतील नरेपार्क येथे शेवटची बुद्ध जयंती साजरी केली. तसेच शेवटचे भाषण २५ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथला केले. सरनाथाला तथागत बुद्धांनी पंचवग्गीय भिक्खूंना पहिला उपदेश केला होता. बाबासाहेबांनी बुद्धत्त्वज्ञानाचे बीज पेरले आणि बुद्धांच्या विचारांची विशाल बाग फुलवली. देशात बुद्धाचा धम्म पुनर्जीवित करण्याचं महान कार्य बाबासाहेबांनी केलं आहे. त्यांनी बुद्ध जयंतीची सुरुवात केली. आणि आज सर्वत्र बुद्ध जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. वैशाखी पौर्णिमेला घडला हा इतिहास, विश्व तारण्या महामानव बुद्ध आले जन्मास.
Comments
Post a Comment