स्वतःच्या कर्तृत्वाने मोरेश्वर हा लॉर्ड्स टेलर व नंतर यशस्वी उद्योजक बनला, त्यांनी शून्यातून विश्व उभारलेल्या कर्तृत्वाची ही यशोगाथा
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी सारख्या शहरात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मोरेश्वरची ही यशोगाथा
हातात शेवटचे दीड रुपये होते. त्यात नवीन शहर. राहायचंच म्हटलं तरी लॉजचं भाडं दोन रुपये होतं. पुढं काय करायचं हा प्रश्न होताच. तरीही तो हिंमत हारला नाही. अमरावतीच्या एका व्यापाऱ्यानं पन्नास रुपयांची नोट मोडून त्याला 50 पैसे दिले. मग सकाळ झाली. त्याच्याही आयुष्याची ही नवीनच पहाट होती. खिशात एकही रुपया नव्हता. आणि इथूनच त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वबळावर आणि अथक परिश्रमातून जिद्दीने पुढं चालून त्यांनं आपलं स्वतंत्र विश्व शून्यातून निर्माण केलं. व्यवसायात नाव कमावलं. या कर्तुत्ववान पुरुषाचं नाव आहे मोरेश्वर राघोबाजी उज्वलकर.
यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील करणवाडी हे त्यांचं गाव. प्राथमिक शिक्षण मोरेश्वर यांनी तिथेच घेतलं. वडील राघोबाजी टेलरिंगचा व्यवसाय आणि शेतमजुरी करायचे. मोरेश्वरसह चार भावंड आणि दोन बहिणी आहेत. घरी शेतीवाडी नसल्यामुळे हेदेखील शेतातली काम करायचे. मोरेश्वर 10 पैसे किलोप्रमाणे दिवसाला 40 किलो कापूस वेचायचा. गावातली पीठ गिरणी सारवायचा. तेव्हा त्याला 2 रुपये मिळायचे. कधी कधी त्यात 10-20 पैसे मिळायचे. तो आनंद तर गगनात मावेनासा व्हायचा. 2 रुपये गुंड याप्रमाणे तो पाणी भरायचा. आपल्या वर्गमैत्रिणीच्या घराजवळच पाणी भरताना त्याला संकोच वाटायचा. मात्र त्यानं कधीच माघार घेतली नाही. वडील राघोबाजी यांचा व्यवसायदेखील सामान्यच होता. एकदा मोठ्या भावाने मोरेश्वरवर हात उचलला. ही गोष्ट त्याला प्रचंड खटकली. त्याचा स्वाभिमान दुखावला. मग मोरेश्वरने आईने जपून ठेवलेले 10 रुपये आईसमोरच घेतले. नंतर थेट वणी गाठलं. काय करायचं हे ठरलं नव्हतं. मात्र घर सोडायचं नक्की झालं होतं. तो वणीत आला. तेव्हा एका टॉकीजमध्ये 'नदिया के पार' हा सिनेमा लागला होता. गोंधळलेल्या मानसिक अवस्थेमध्ये या सिनेमानं त्याला दिलासा मिळाला.
दुसऱ्या दिवशी वणीच्या बस स्टॅंडवर फ्रेश होऊन मोरेश्वर कामाच्या शोधात निघाला. त्याला वणीतल्या राजपुताना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. आयुष्यात हे काम तो पहिल्यांदाच करत होता. तिथंच खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था झाली. खायला पुरी भाजी मिळायची. भांडी घासायच्या मोरीजवळ तो झोपायचा. असं करीत त्यांना दीड महिना काढला. एक दिवस अनपेक्षित त्याचे उमरीवाले भाऊजी हॉटेलमध्ये आले. मोरेश्वरला त्याच्या भावना आवरता आल्या नाही. तो ढसाढसा रडला. ते त्याला उमरीला घेऊन गेले. त्याला 300 रुपये महिना देऊ केला. मोरेश्वरचं मारेगावच्या आदर्श शाळेत शिक्षण सुरूच होतं. ते त्याला पूर्ण करायचं होतं. त्याचा क्लासमेट आणि मारेगावचा मित्र शेख हुसेन शेख इस्माईलने माडीवर राहण्याची व्यवस्था केली. भाऊजींनी त्याला एक पितळेचा स्टोव्ह घेऊन दिला. इकडून तिकडून काही भांडी गोळा केलीत. ताट उलटं करून दारूच्या बाटलीने तो पोळ्या लाटायचा. आहे त्याच्यासह आणि नाही त्याच्याशिवाय मोरेश्वरचा प्रवास सुरू झाला.
भाऊजींनी दिलेले 300 रूपये जवळपास 20 दिवसच पुरायचे. संपलेत की परत भाऊजींना मागायचे. हे असंच सुरू होतं. असं करीत मोरेश्वरने 8-10 महिने काढले. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. तेव्हा तो आठव्या वर्गात होता. सायकलने वणीवरून तो ब्रेड आणायचा. खैरी, वडकी, आष्टोणा, महादापेठ, कुंभा, करंजी, बुरांडा, कोठोडा, एवढ्या लांबच्या परिसरात सायकलने तो ब्रेड विकायचा. दहावीची परीक्षा झाली. त्यात तो नापास झाला. मात्र खचला नाही. पुन्हा परीक्षा देऊन तो पास झाला. नंतर मारेगावच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. तिथून त्याने अकरावी आणि बारावी केलं. नंतर तो चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे गेला. मात्र तिथल्या आनंदनिकेतन कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला नाही. लहानपणीच वडिलांकडून त्याला टेलरिंगचं ट्रेनिंग मिळालं होतं. ते तिथं कामात आलं. वरोऱ्यात एका टेलरकडे तो कारागिरी करू लागला. काही काळानंतर तो वणीला परत आला. इथल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यानं प्रवेश घेतला. इथंदेखील राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न कायम होताच. तेव्हा त्याला एक मित्र भेटला. तो गव्हर्नमेंट होस्टेलला राहायचा. तिथं प्रवेश मिळेल काय? आरक्षण आहे काय? हीदेखील काळजी होतीच. तिथं सर्व जातींना आरक्षण असल्याचं कळलं. प्रवेश मिळाला. एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही. ग्रॅज्युएशन सुरू असताना नापास झाले. एटी-केटी मिळाली. त्यामुळे पुढील वर्षाच्या प्रवेशाचे मार्ग बंद झालेत. शेवटी एक रूम केली. मधल्या काळात टेलरिंगच्या कारागिरीचं काम सुरूच होतं. चार पैसे हातात पडायचे. शिक्षणाचा आणि अन्य खर्च निघायचा. अगदी लहानपणापासूनच मोरेश्वरने स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलला यासाठी वाटेल ती काम केली.
सन 1992 ला मोरेश्वरनं धाडसी पाऊल उचललं. लॉर्ड्स टेलर्स या नावानं स्वतःचा टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. सिनेसृष्टीतील बेल बॉटम, पॅरलल बॅगीपासून सगळ्याच स्टाईल वणीकरांना दिल्यात. सन 2003 मध्ये ड्रेसचं डिझाईन ते कम्प्युटरवर करायचे. ड्रेस तयार झाल्यावर कसा दिसेल हे ग्राहकांना दाखवायचे. हे काळाच्या कितीतरी पुढंच होतं. पाहता पाहता लॉर्ड्स टेलर्स वणीतील एक ब्रँड बनला. सन 2018 पर्यंत हा व्यवसाय त्यांनी केला. पाई पाई जोडून नागपूर रोडवर 1997ला स्वतःचं घर घेतलं. मोरेश्वर स्वतः कलावंत आहेत. क्रिएटिव्ह आहेत. अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवात बुलढाणा येथे त्यांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली होती. त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. मग त्यांनी सन 2008 मध्ये रेस्टॉरंट सुरू केलं. ते स्वतः चांगले कूक आहेत. एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटचे मालक असूनसुद्धा ते अनेकदा स्वतः ग्राहकांसाठी सेवा देतात.
मोरेश्वर यांना समाजाबद्दल कळवळ आहे. ते नेहमी काही ना काही उपक्रम राबवत असतात. त्यांच्या जन्मदिवसाला कोणत्याही सहा वर्षांच्या मुलीसाठी फिक्स डिपॉझिट केलं होतं. त्याचा अनेक मुलींना लाभ झाला. ज्याची तिला 21 व्या वर्षी मोठी रक्कम मिळते. जी तिच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या कामात पडते. विशेष म्हणजे हीच योजना शासनानं पुढं लागू केली. शिंपी समाजाचे ते अध्यक्ष आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती आणि पुण्यतिथी त्यांच्याच नेतृत्वात साजरी केली जाते. यानिमित्त ते विविध कार्यक्रमांचे आयोजनदेखील करतात. देवावर त्यांची श्रद्धा आहे. मात्र ते अंधश्रद्ध नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. राजकीय क्षेत्रातदेखील ते सक्रिय आहेत. एका जन्मदिवसाला त्यांनी ट्रकभर धान्य गरिबांना वाटप केलं. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम घेतले. जनहितासाठी आंदोलने केलीत. आज ते यशस्वी उद्योजक आहेत. नव्या व्यावसायिकांना ते मार्गदर्शन करतात. त्यांचे जीवन म्हणजे नव्या पिढीला एक प्रेरणाच आहे. 1 जून हा त्यांचा जन्मदिवस. त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Comments
Post a Comment