अवैध वृक्षतोड प्रकरणी अखेर गुन्हा दाखल, मात्र वागदरा ग्रामपंचायत हद्दीतील वृक्षतोड प्रकरण अजूनही गुलदस्त्यातच
सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेल्या काँक्रीट नालीवर दुकान थाटलेल्या एका अतिक्रमण धारकाने नगर पालिका हद्दीतील विशाल वृक्षाची भरदिवसा कत्तल केली होती. तहसील कार्यालयासमोर व वन विभागापासून हाकेच्या अंतरावर ही वृक्षतोड करण्यात आली. कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या कुंपण भिंतीला लागून असलेले हिरवेगार झाड अवैधरित्या तोडण्यात आले. हे झाड अतिक्रमणाला अडसर ठरत असल्याने अतिक्रमणधारकाने या झाडावर कुऱ्हाड चालविली. वाटसरूंना शीतल छाया देणाऱ्या या विशाल वृक्षाची कत्तल करण्यात आल्याने वृक्षप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वृक्ष संवर्धन संघटनांकडूनही कमालीचा संताप व्यक्त करण्यात आला. शेवटी नगर पालिकेच्या तक्रारीवरून अवैध वृक्षतोड करणाऱ्या त्या व्यक्तीवर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारची एक घटना काही दिवसांपूर्वी वागदरा ग्रामपंचायत हद्दीत घडली होती. वागदरा गावातील २५ ते ३० वर्ष जुने असलेले झाड जेसीबी लावून पाडण्यात आले. कडू लिंबाच्या या विशालकाय वृक्षाची कत्तल करण्यात आल्याने गावकऱ्यांमधून कमालीचा संताप व्यक्त करण्यात आला होता. ग्रामपंचायतीचा ठराव किंवा वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता पुरातन झाड निर्दयीपणे तोडण्यात आले. या झाडामुळे कुठलाही अडथळा किंवा ग्रामपंचायतीची कोणतीही कामे प्रभावित झालेली नसतांना देखील सावली देणारं हे झाड तोडण्यात आल्याने याबाबत गावातीलच एका सामाजिक कार्यकर्त्याने वन विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. तक्रारीचा त्यांनी वेळोवेळी पाठपुरावाही केला. पण लोकप्रतिनिधीच त्यात गुंतला असल्याने तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे अवैध वृक्षतोड प्रकरणी लोकप्रतिनिधी व सामान्य जनतेसाठी वेगळे कायदे आहेत काय, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. नगर परिषद हद्दीतील झाड तोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर ग्रामपंचायत हद्दीतील झाड तोडणाऱ्यावर कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काँक्रीट नालीवर अतिक्रमण करून दुकान लावलेल्या एका अतिक्रमणधारकाने अतिक्रमणाला अडसर ठरणारे बदामाचे हिरवेगार झाड तोडले. त्यानंतर या प्रकरणावर वृत्त माध्यमांनी प्रकाश टाकला. त्यामुळे वृक्षप्रेमींनी तीव्र आक्षेप घेत झाड तोडणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. नगर पालिका प्रशासनावर कार्यवाहीसाठी दबाव वाढल्याने आरोग्य विभागाचे भोलेश्वर ताराचंद यांनी अवैध वृक्षतोड प्रकरणाचा पंचनामा करून पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी तब्बल २० दिवसांनी संघर्ष इंटरनेट कॅफेचे संचालक सुरेश दादाजी शेंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १८ मे ला मुख्य रस्त्यावरील हे बदामाचे झाड तोडण्यात आले. तर २१ मे ला नगर पालिकेने या प्रकरणाचा पंचनामा करून पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून १० जूनला सुरेश शेंडे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येते. झाडे लावा झाडे जगवा, हा संदेशच शासनाकडून देण्यात आला आहे. वृक्षप्रेमी जनता वृक्षांचे संवर्धन करण्याकरिता हरसंभव प्रयत्न करते. वृक्ष संवर्धन समिती कडूनही वृक्षवाढीकरिता मोठे परिश्रम घेतले जातात. परंतु काही असंवेदनशील व्यक्तींकडून अमानुषपणे वृक्षांची कत्तल करण्यात येते. तहसील कार्यालय परिसरातील एका विशाल वृक्षाची निर्भीडपणे कत्तल करणाऱ्या व्यक्तीवर अखेर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अशीच एक वृक्षतोडीची घटना वागदरा ग्रामपंचायत हद्दीत घडली होती. रस्त्याच्या कडेला असलेले कडू लिंबाचे झाड जेसीबी लावून तोडण्यात आले होते. २५ ते ३० वर्ष जुने असलेले हे झाड कुठलेही कारण नसतांना नष्ट करण्यात आले. गावकऱ्यांना सावली देणारे हे विशालकाय कडू लिंबाचे झाड एका लोकप्रतिनिधीने मनमर्जीने तोडल्याचा आरोप गावातून करण्यात आला. या वृक्षतोड प्रकरणी गावातीलच एका सामाजिक कार्यकर्त्याने वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. ते आजही तक्रारीचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी माहितीच्या अधिकारात स्पॉट पंचनाम्याची प्रत देखील मागितली होती. पण त्यांच्या तक्रारीची व माहितीच्या अधिकाराची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. गावातील विद्यमान लोकप्रतिनिधी असल्याने वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधातील तक्रार गांभीर्याने घेतली नाही. अकारण वृक्षाची कत्तल करूनही त्यांच्यावर मेहेरनजर दाखविण्यात आली. एवढेच नाही तर वृक्षतोड करणाऱ्याविषयीच सहानुभूती दाखवून तक्रारकर्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामपंचायतीला हे झाड न तोडताही कामे करता आली असती. ग्रामपंचायतीने झाड तोडण्यासंदर्भात कुठलाही ठराव घेतला नाही. किंवा वन विभागाची परवानगी देखील घेतली नाही. तरीही लोकप्रतिनिधीने जेसीबी लावून हे झाड तोडले. कुठलीच अडचण नसतांना झाड तोडण्याचे अधिकार त्या व्यक्तीला दिले कुणी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. आजही त्या विशकाय वृक्षाचे अवशेष त्याच ठिकाणी पडले आहेत. वन विभागाने ग्रामपंचायत हद्दीतील वृक्षतोड करणाऱ्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. केवळ थातुर मातुर करणे सांगितली गेली. नंतर लोकप्रतिनिधी कडूनही सारवासारव करण्यात आली. परंतु ठोस कारण मात्र कुणीही सांगायला तयार नाही. त्यामुळे नगर परिषद हद्दीतील झाड तोडणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने हे प्रकरणही उजेडात आले आहे. तेंव्हा वृक्षतोड प्रकरणी लोकप्रतिनिधी व आम जनतेसाठी कायदे वेगळे आहेत काय, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. वागदरा गावातील हे झाड तोडून पाच ते सहा महिने झाले आहेत. पण संबंधित व्यक्तीवर कोणती कार्यवाही करण्यात आली, हे मात्र अद्यापही तक्रारकर्त्याला सांगण्यात आले नाही. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वागदरा येथील वृक्षतोड प्रकरणी तेथीलच सामाजिक कार्यकर्त्याने केलेल्या तक्रारीवर कार्यवाही होईल काय, अशी मागणी होऊ लागली आहे.
No comments: