शहरातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेसचे धरणे आंदोलन, प्रशासनाला दिला ७ दिवसांचा अल्टिमेटम
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील विभिन्न समस्या व शहरवासीयांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेस वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज १३ जूनला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. गोर गरीब कष्टकरी जनता व कास्तकारांना भेडसावणाऱ्या समस्या तथा शहरवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन काँग्रेसने तहसिल कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी शासन व प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर आंदोलनकर्त्यांनी कडाडून टीका केली. तसेच शेतकरी, कष्टकरी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ७ दिवसांत मागण्यांची दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन दिल्यानंतर धरणे आंदोलनाची सांगता झाली.
शहरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणी पुरवठा नियमित होत नाही. तर विद्युत पुरवठ्यात अनियमितता आली आहे. पाणी पुरवठा व विद्युत पुरवठ्याची जराही शाश्वती राहिलेली नाही. बी-बियाणे, खते व कीटकनाशकांच्या दरात भरमसाठ वाढ करून शासनाने कास्तकारांचे कंबरडे मोडले आहे. शेती उपयोगी वस्तू व साहित्यांचे दर प्रचंड वाढल्याने कास्तकार चांगलाच अडचणीत आला आहे. बँकेकडून पीक कर्ज मिळविण्यासाठीही शेतकऱ्यांची फरफट होतांना दिसत आहे. शहरातील प्रदूषण उचांकी पातळीवर आहे. ग्रामीण रुग्णालयाला अद्याप उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला नाही. ट्रामा केयर सेंटर बंद पडलेले आहे. शासकीय रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ती अद्याप भरण्यात आलेली नाही. ग्रामीण रुग्णालयात औषधांचा नेहमी तुटवडा असतो. औषधांचा साठाच राहत नसल्याने रुग्णांना स्वखर्चाने औषधी घ्यावी लागते. जुनाड पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन ३ वर्ष झाले आहेत. पण अद्यापही पुलाला जोडणारा रस्ता बांधण्यात आलेला नाही. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकरी नुकसान भरपाई मिळण्याची चातकासारखी वाट बघत आहेत. शासकीय दरात चांगल्या प्रतीची वाळू मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या सर्व समस्या शासनाच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अद्यापही सुटलेल्या नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार व सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील समस्या व जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन काँग्रेस वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज १३ जूनला तहसिल कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी शासन व प्रशासनावर कडाडून टीका करण्यात आली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम - संजय खाडे
पाणी, वीज व शेतक-यांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. आमच्या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र यावेळी प्रशासनाने ७ दिवसांच्या आत मागण्यांची दखल न घेतल्यास काँग्रेस कडून आक्रमक पवित्र घेतला जाईल. मागण्यांवर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसतील, याची प्रशासनाने दखल घ्यावी.
Comments
Post a Comment