दीर्घ प्रतीक्षेनंतर उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या आशा पल्लवित, राजकीय हालचालींना आला वेग
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा रेंगाळत असलेला प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वणी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे, ही मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु शासकीय स्तरावरून याची दखल घेण्यात आली नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही मागणी सतत लावून धरल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. मनसेच्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालय साकार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी नुकतीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यांच्याशी शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्याबाबत चर्चा करतांनाच वणी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी देखील केली. आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत वणी येथे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वणी येथे आता दीर्घ प्रतिक्षेनंतर उपजिल्हा रुग्णालय साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वणी ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवा तोडक्या आहेत. आरोग्य सुविधांचाही मोठा अभाव आहे. याठिकाणी योग्य उपचार मिळतांना दिसत नाही. तांत्रिक उपचाराचीही याठिकाणी उणीव दिसून येते. आधुनिक उपचार पद्धती याठिकाणी उपलब्ध नाही. गर्भवती महिलांचीही याठिकाणी कुचंबणा होतांना दिसते. प्रसूती करीता दाखल होणाऱ्या महिलांची रुग्णालयात योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यांना औषधी बाहेरून आणावी लागते. शस्त्रक्रियेसाठी अन्य रुग्णालयात हलविण्याच्या सूचना दिल्या जातात. रुग्णांना रेफर करणारे रुग्णालय म्हणून वणी ग्रामीण रुग्णालयाची ओळख बनली आहे. डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांची येथे वानवा दिसून येते.
वणी हा यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असतांना येथे उपजिल्हा रुग्णालय नाही. खनिज संपन्न व औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेला हा तालुका आरोग्य व शैक्षणिक सुविधांपासून कोसो दूर राहिला आहे. खनिजातून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवून देणारा हा तालुका कायम दुर्लक्षित राहिला आहे. लोकप्रतिनिधींची उदासीनता व श्रेय लाटणारं राजकारण याला कारणीभूत ठरलं आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा राजकीय स्टंट बनल्याचे दिसून येत असतांनाच मनसे नेते राजू उंबरकर यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालयाची वाट मोकळी करून दिली आहे.
मनसे नेते राजू उंबरकर यांनी वणी उपविभागातील जनतेला उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळवी म्हणून रुग्णालय प्रशासनाला नेहमी धारेवर धरले. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यविषयक समस्या त्यांनी उचलून धरल्या. उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दाही त्यांनी तेवत ठेवला. वणी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून त्यांनी सतत पाठपुरावा केला. नुकतीच त्यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन वणी येथील उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला. वणी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याबाबत पत्र दिले. राजू उंबरकर यांच्या मागणीची दखल घेऊन आरोग्य मंत्र्यांनी लवकरच उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देत रुग्णालय उभारणीच्या कामाला गती देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे आता शहरात लवकरच उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात येणार आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता लवकरच उपजिल्हा रुग्णालयाला मुहूर्तरुप मिळणार आहे. त्यामुळे आता उपविभागातील जनतेलाही उत्तम आरोग्यसेवेचा लाभ घेता येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी रुग्णालयाला मिळालेले जनरेटर अजूनही बिनकामीच, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे
वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सध्या ढेपाळल्याचे दिसत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची अनुपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कर्मचारीही सातत्याने गैरहजर असतात. रुग्णांना योग्य उपचार मिळतांना दिसत नाही. रुग्णांना तांत्रिक अडचणींचाही नेहमी सामना करावा लागतो. एक्सरे मशीन जास्त नादुरुस्तच असते. साप चावलेल्या रुग्णांना देखील रेफर करण्यात येते. गंभीर आजारावरील लसींचा नेहमी तुटवडा असतो. औषधांचा देखील पुरेसा साठा नसतो. रॅबिजचे इंजेक्शनही कधी उपलब्ध नसतात. रुग्णलयाच्या कारभारावर सध्या कुणाचही नियंत्रण राहिलेलं नाही. दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाला मिळालेले जनरेटर अजूनही उपयोगात आणण्यात आले नाही. ते जागेवरच पडल्या पडून कुजायला लागले आहे. रुग्णालयाला या जनरेटरचा कुठलाही उपयोग झाल्याचे दिसत नाही. बेजबाबदारपणाने याठिकाणी कळस गाठला आहे. हे भव्य जनरेटर कार्यान्वित न झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला की रुग्णांची मोठी हेळसांड होते. लाईन गेली की उपचारातही व्यत्यय येतो. पण वैद्यकीय अधीक्षकांनी जनरेटर मात्र सुरु केले नाही. ग्रामीण रुग्णालयात कुणाचच कुणावर नियंत्रण राहिलेलं नाही. तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे ज्या सोइ सुविधा उपलब्ध आहेत, त्या तरी व्यवस्थित मिळाव्या, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्येकर्ते रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment