खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरु झाला आणि करंट लागून वेल्डिंग कारागिराचा जीव गेला

प्रशांत चंदनखेडे वणी 

विजेच्या धक्क्याने एका वेल्डिंग कारागिराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज १७ जूनला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. निलेश अशोक जरिले (२७) रा. हिवरा (मजरा) ता. मारेगाव असे या करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. 

मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथील एका वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या या तरुणाला गावातीलच प्रसाद ठावरी यांच्या घरी वेल्डिंगच्या कामासाठी पाठविण्यात आले होते. ठावरी यांच्या घरी वेल्डिंगचे काम सुरु असतांना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे तरुणाने इलेक्ट्रिक बोर्डला लागलेला वायर गुंडाळणे सुरु केले. परंतु तेवढ्यात वीज पुरवठा सुरु झाला. मात्र वायर इलेक्ट्रिक बोर्डला लागूनच राहिल्याने तरुणाला विजेचा जोरदार करंट लागला. वेल्डिंग कारागिराला विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ विजेचा प्रवाह बंद केला. आणि तरुणाला लगेच ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तरुणाच्या अशा या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील कर्त्या तरुणावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

शहरासह तालुक्यात सध्या विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून कित्येक तरी वेळा वीज पुरवठा खंडित होतो. वीज पुरवठा कधी खंडित होईल याची आता शाश्वतीच राहिलेली नाही. कुठलेही कारण नसतांना वीज गुल होते. नंतर तासंतास वीज येत नाही. वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे नागरिक पुरते वैतागले आहेत. वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवण्याचं कुठलंच नियोजन वीज वितरण कंपनी करतांना दिसत नाही. भर उन्हाळ्यात विजेच्या समस्येशी नागरिकांना झुंजावे लागले. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. उकाड्यामुळे बेजार झालेले नागरिक खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे चांगलेच हैराण झाले. विजेचा लपंडाव नागरिकांची डोकेदुखी बनलेला असतांनाच या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आज एका कारागिराचा जीव गेला. वेल्डिंगचे काम करतांना वीज पुरवठा खंडित झाला आणि काही वेळात वीज पुरवठा सुरु झाला. दरम्यान बोर्डला लागलेला वायर गुंडाळत असतांना करंट लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी