२०० युनिट मोफत विजेकरिता शिवसेनेचे (उबाठा) अनोखे स्वाक्षरी अभियान, पंतप्रधानांना पाठविणार १ लाख १६ हजार १६ स्वाक्षऱ्या
प्रशांत चंदनखेडे वणी
घरगुती विजधारकांना २०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी व शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांना घेऊन शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात शहरातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर अनोखे स्वाक्षरी अभियान सुरु करण्यात आले आहे. १७ जून ते १६ जुलै पर्यंत हे स्वाक्षरी अभियान चालणार आहे. या मागण्यांची दखल घेण्यात यावी म्हणून पंतप्रधानांना वणी विधानसभा क्षेत्रातून १ लाख १६ हजार १६ स्वाक्षऱ्या पाठविण्यात येणार आहे. काल पासून या स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली आहे.
माझी वीज माझा अधिकार, या तळपत्या मुद्द्याला शिवसेना नेते संजय देरकर यांनी हात घातला आहे. घरगुती वीज वापरणाऱ्यांना २०० युनिट मोफत वीज देण्याच्या मागणीला घेऊन त्यांनी अनोखे आंदोलन सुरु केले आहे. निवडणूक काळात नेत्यांना जनतेचा कळवळा येतो. मत मागण्यापुरता त्यांचा पुळका येतो. पण सरकार स्थापन झाल्यानंतर जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले जात नाही. जनतेला कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जात नाही. जनता निव्वळ आश्वासनात भरडली जाते. निवडणूका संपल्या की नेत्यांची आश्वासने हवेत विरतात. जनतेच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष देतांना दिसत नाही. आज विजेच्या युनिटचे दर प्रचंड वाढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी वीज बिल भरणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे २०० युनिट पर्यंत वीज मोफत दिल्यास त्यांना मोठा आधार होऊ शकतो.
दिल्लीत २०० युनिट पर्यंत वीज मोफत आहे. मग महाराष्ट्रात हा प्रयोग का करण्यात येत नाही, हेच कळत नाही. ५ हजार मेगावॅट वीज निर्मिती करणारे हे राज्य आहे. कोळसा महाराष्ट्रातला, जमीन इथलीच, पाणीही इथलेच तरीही सर्वाधिक वीज दर येथील जनतेवर आकारण्यात येत आहे. वीज निर्मिती करीता होणारे प्रदूषण, आजार, अपघात, त्वचारोग आदी विविध समस्या येथील जनतेला सहन कराव्या लागतात. भारनियमन, कमी दाबाचा विद्युत पुरवठा, वीज बिल भरमसाठ तथा अधिभाराच्या माध्यमातून वीज बिलात जनतेची मोठी लूट करण्यात येते. तेंव्हा आता हे चालणार नाही, असा इशारा शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने देण्यात आला आहे. २०० युनिट पर्यंत वीज मोफत देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याच्या मागणीला घेऊन शिवसेना नेते संजय देरकर यांच्या नेतृत्वात "माझी वीज माझा अधिकार" हे स्वाक्षरी अभियान सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून पंतप्रधानांना १ लाख १६ हजार १६ स्वाक्षऱ्या पाठविण्यात येणार आहे.
स्वाक्षरी अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी देण्यात यावी, घरगुती विजधारकांना २०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी, २०० युनिट वरील विजेचे युनिट दर २.५० रुपये प्रमाणे आकारावे, लघु व कुटीर उद्योगांना सवलतीच्या दरात वीज द्यावी, झरी व मारेगाव तालुक्यात १३२ केव्ही वीज केंद्र उभारण्यात यावे, सोलर पॅनलवर आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ९० टक्के सवलत देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतपंपासाठी तात्काळ वीज जोडणी करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
No comments: