Latest News

Latest News
Loading...

तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून एका पाठोपाठ होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. तालुक्यातील मोहर्ली येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाने शेत शिवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १८ जूनला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वैभव संजय येरकाडे (१७) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

युवावर्ग नैराश्येतून आत्महत्या करू लागल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कुटुंबाचा आधार असलेले तरुण आत्मघाती निर्णय घेऊ लागल्याने पालक चांगलेच काळजीत आले आहेत. मोहर्ली येथे कुटुंबासोबत राहत असलेल्या तरुणाने नैराश्येतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्याने गावातील युवराज राजूरकर यांच्या शेतातील नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून जीवनाचा शेवट केला. वैभव हा शहरातील एका महाविद्यालयात १२ वी चे शिक्षण घेत होता. त्याने आज दुपारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या काकाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. काकाने लगेच आपल्या भावाला फोन करून वैभवने गळफास घेतल्याची माहिती दिली. मुलाने फाशी घेतल्याचे समजताच चारगाव येथे कामाला गेलेले वडिल तात्काळ मोहर्ली येथे पोहचले. त्यांना वैभव हा झाडाला दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. नंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरून घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. वैभवच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र तरुण मुलाच्या अशा या आत्मघाती निर्णयाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैभव याच्या पश्च्यात आई, वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.  



No comments:

Powered by Blogger.