वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वहिती वरून मोठ्या भावाची लहान भावाला मारहाण
प्रशांत चंदनखेडे वणी
वडिलोपार्जित शेतीची वहिती करण्यावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. मोठ्या भावाने लहान भावाला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यात लहान भावाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर संतोष हरी वानखेडे (५१) रा. सगणापूर याने आपला मोठा भाऊ विवेक वानखेडे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी विवेक वानखेडे याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२६, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वडिलोपार्जित ५ एकर शेतीचे चार भाऊ व दोन बहिणी असे वारस आहेत. संतोष वानखेडे व त्याचे भाऊ हे शेत वाहतात. विवेक वानखेडे हा देखील आपल्या लहान भावाला शेत वाहण्याकरिता द्यायचा. मात्र सततच्या नापिकीमुळे यावर्षी लहान भावाने मोठ्या भावाच्या हिस्साची शेती वाहिली नाही. त्यामुळे मोठ्या भावाचा राग अनावर झाला. त्याने लहान भावाच्या घरी जाऊन शेतीच्या वहिती वरून वाद उपस्थित केला. वडिलांची शेती तू कशी वाहतो म्हणून लहान भावाला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. लाकडी दांड्याचा मार बसल्याने लहान भाऊ जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने २० जूनला मोठ्या भावाविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment