प्रशांत चंदनखेडे वणी
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजूर (कॉ.) हे गाव सध्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गाजू लागलं आहे. या गावात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागली आहे. गुन्हेगारी जगतात नावाजलेली ओळख पुसली जात असतांनाच परत या गावात गुन्हेगारी कारवायांची धग निर्माण होऊ लागली आहे. येथे भाईगिरीचा प्रचंड बोलबाला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. काही टपोरी तरुणांनी दहशत निर्माण करण्याकरिता टोळके तयार केल्याचीही कुजबुज गावातून ऐकायला मिळत आहे. एका युवतीचे आंघोळ करतानाचे चित्रीकरण करण्यापर्यंत या टपोरी तरुणांची मजल वाढली आहे. युवती घरी आंघोळ करीत असतांना हा टपोरी तरुण स्नानगृहाजवळ आला, व लपून तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करू लागला. परंतु हे दुष्कृत्य करतांना या नराधमावर युवतीची नजर पडली. युवतीने आरडाओरड करताच आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकाराने युवती चांगलीच भयभीत झाली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तिला सोबत घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. युवतीने पोलिसांसमोर आपबिती कथन केली. युवतीच्या तक्रारी वरून पोलिसांनी घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सतेंद्र सुखरी प्रसाद (२५) असे या आरोपीचे नाव आहे. २० जूनला ही कार्यवाही करण्यात आली.
राजूर (कॉ.) येथे राहणाऱ्या एका युवतीला आरोपी हा नेहमी त्रास द्यायचा. तिचा पाठलाग करायचा. तिचे फोटो व व्हिडीओ काढायचा. परंतु युवतीने या टपोरी तरुणाच्या नादी कशाला लागायचं म्हणून त्याच्या टपोरीगिरीकडे नेहमी दुर्लक्ष केलं. मात्र यावेळी त्याने हद्दच पार केली. युवती सकाळी घरी आंघोळ करीत असतांना हा तरुण तिच्या स्नानगृहापर्यंत पोहचला. लपून तिचे आंघोळ करतांनाचे चित्रीकरण करू लागला. परंतु युवतीचं अचानक त्याच्याकडे लक्ष गेलं. या टपोरी तरुणाला स्नानगृहाजवळ पाहून ती चांगलीच घाबरली. तो तिचा व्हिडीओ काढत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरड केली असता आरोपीने तेथून पळ काढला. तिने हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांनी मुलीला घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. युवतीच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सतेंद्र प्रसाद याच्या विरुद्ध भादंविच्या कलम ३५४(सी), ३५४(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात दत्ता पेंडकर व जमादार अविनाश बनकर करीत आहे.
No comments: