उद्या ४ जूनला लागेल लोकसभा निवडणुकीचे निकाल, चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कोण उधळेल विजयाचा गुलाल !
प्रशांत चंदनखेडे वणी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी बाजी मारेल, की महायुतीचाच डंका वाजेल याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. प्रस्थापितांसाठी प्रतिष्ठेची तर पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या उमेदवारांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची मानली जात आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी हा लोकसभा मतदार संघ भाजप कडून हिरावून घेत काँग्रेसने मोठी उलथापालथ केली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला पराभूत करून दणदणीत विजय साकार केला होता. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनाच काँग्रेसने उमेदवारी बहाल केली. तर भाजपने तीनदा खासदार राहिलेल्या हंसराज अहिर यांना उमेदवारी नाकारून या क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक रिंगणात उतरविले. दोनही उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडवीला. पक्षांनीही आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी झंझावाती प्रचारसभा घेतल्या. उमेदवारांचा विजय साकार करण्यासाठी पूर्ण ताकद झोकली. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवाराच्या विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची मनाली जात आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळेल याकडे आता संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे. उद्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असल्याने सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. १५ उमेदवार या निवडणुकीत आपलं भाग्य आजमावत आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर व महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांच्यातच विजयासाठी थेट लढत झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर झाल्याने जनतेला आता निकालाची उत्सुकता लागली आहे. यात वंचितचे राजेश बेले व बसपाचे राजेंद्र रामटेके यांना मिळणाऱ्या मतांवर देखील विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी हे सहा विधानसभा क्षेत्र येतात. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १८ लाख ३७ हजार ९०७ मतदार आहेत. त्यापैकी १२ लाख ४१ हजार ९५२ मतदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात ६७.५७ टक्के मतदान झाले होते. उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती ती निकालाची. शेवटी निकालाची तारीख उजळणार असून उद्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे.
पक्षांनी उमेदवारांच्या केलेल्या विजयाच्या दाव्यांवरून उद्या पडदा उठणार आहे. चंद्रपूर लोकसभा हा कुणबी बहुल मतदारसंघ असल्याने या मतदार संघात जातीय समीकरण महत्वाचं ठरतं. परंतु त्यानंतरही हंसराज अहिर यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून विजय साकार केला होता. मात्र पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या बाळू धानोरकर यांनी त्यांच्या विजयाचा रथ रोखला. आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना करारी मात दिली. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्याच आमदार पत्नीला पक्षाकडून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांच्या विजयासाठी काँग्रेस नेत्यांनी मतभेद विसरून जोरदार प्रचार केला. निकालपूर्व झालेल्या चाचण्यांमध्येही प्रतिभा धानोरकर यांनाच विजयाचे दावेदार मानले जात आहे. परंतु भाजप कडून सुधीर मुनगंटीवार यांचाच विजय साकार होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कुणाचा विजय साकार होईल व कोण विजयाचा गुलाल उधळेल हे उद्या ४ जूनला स्पष्ट होणार आहे.
No comments: