Latest News

Latest News
Loading...

काँग्रेसने साजरा केला प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष, शहरातून काढण्यात आली विजयी मिरवणूक


 
प्रशांत चंदनखेडे वणी 

अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचा निकाल अपेक्षेप्रमाणे धक्कादायकच लागला. भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला पराभूत करून काँग्रेसच्या महिला उमेदवाराने आव्हानात्मक विजय साकार केला. विद्यमान वनमंत्री असलेले सुधिर मुनगंटीवार यांचा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल २ लाख ६० हजार मतांनी पराभव करून एकहाती विजय साकार केला. महायुती सरकारमध्ये वनमंत्री व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या सुधिर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदली आहेत. तसेच राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येत आहे. सुधिर मुनगंटीवार यांच्या रूपाने तगडे आव्हान उभे केल्यानंतरही मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागल्याने भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या मोठ्या विजयाने काँग्रेस नेत्यांमध्ये नवचैतन्य जागलं आहे. हा विजय काँग्रेसच्या राजकारणाला नवी उभारी देणारा ठरला आहे. प्रतिभा धानोरकर यांनी गड राखल्याने काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. काल ६ जूनला सायंकाळी शिवतीर्थ येथे काँग्रेसच्या वतीने प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. प्रतिभा धानोरकर यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्याकरिता क्रेन मागविण्यात आली होती. नंतर फुलांनी सजलेल्या वाहनातून त्यांची शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवतीर्थ येथेच भव्य सभा घेण्यात आली. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेसचे नेते संजय खाडे, शिवसेनेचे (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्यासह महाविकस आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा विकास व जनतेची कामे करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. 

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून प्रतिभा धानोरकर यांच्या झालेल्या रेकॉर्डब्रेक विजयाने काँग्रेस वर्तुळात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. २ लाख ६० हजार ४०६ मतांनी प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. वणी विधानसभा क्षेत्रातून त्यांना ५६ हजार ६४८ मतांची लीड मिळाली. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांच्या प्रचाराची धुरा संजय खाडे यांनी वाहिली. संजय खाडे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराकरिता वणी विधानसभा क्षेत्र पिंजून काढलं. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांना आघाडी मिळवून देण्यात संजय खाडे यांचा खारीचा वाटा राहिला आहे. आर्णी विधानसभा क्षेत्रातून प्रतिभा धानोरकर यांना १९ हजार ५५६ मतांची लीड मिळाली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप उमेदवाराचा सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत पराभव झाला आहे. आधी पतीने तर आता पत्नीने भाजपच्या बलाढ्य उमेदवाराला पराभवाची चव चाखविली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत बाळू धानोरकर यांनी भाजपच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला होता. तर आता त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी विद्यमान मंत्र्याचा पराभव करून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातुन झालेल्या सलग दुसऱ्या पराभवामुळे भाजपवर चिंतनाची वेळ आली आहे. 

काँग्रेस कडून तिकीट मिळविण्यात यश आल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रचार केला. काँग्रेसनेही त्यांच्या प्रचारात कुठलीही कसर बाकी ठेवली नाही. प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे मतभेद दूर करून त्यांना एकत्र आणण्याचे काम केले. काँग्रेसच्या प्रत्येक नेते व पदाधिकाऱ्यांना त्यांनी सोबत घेतले. कार्यकर्त्यांनाही त्यांनी संघटित केले. त्यामुळे काँग्रेस मधील प्रत्येकच जण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची सहानुभूती त्यांच्या पाठीशी होतीच. महिलेला उमेदवारी मिळाल्याने महिलांनीही त्यांच्या विजयासाठी कंबर कसली. ओबीसी बहुल मतदारसंघ असल्याने त्याचाही लाभ त्यांना मिळाला. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही या काँग्रेसच्या प्रचारानेही जनतेची मने वळविली. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनेही देशात पूरक वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे या सर्वांचा लाभ काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाला. सर्व सकारात्मक बाबी घडल्याने प्रतिभा धानोरकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही त्यांच्या विजयात योगदान राहिले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आपापली जबाबदारी पार पाडली. शेवटी महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडल्याची चर्चा मतदार संघात रंगू लागली आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या विजयाचा जल्लोष काल धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती. महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शहरातून विजयी मिरवणूक व भव्य सभा घेण्यात आली. 

लोकप्रतिनिधी हा लोकांमधून निवडला जातो. मतदार उमेदवाराची निवड करतात. त्यामुळे मतदार हा राजा असतो. जनता आपला प्रतिनिधी निवडून संसदेत पाठवितात ते आपल्या क्षेत्राचा विकास करण्याकरिता. आपल्या समस्या व प्रश्न सोडविण्या करीता. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता. शिक्षण व आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्याकरिता. मात्र नंतर जनतेवरच पश्चातापाची वेळ येते. सोइ, सुविधा, शिक्षण, रोजगार व आरोग्यासेवा उपलब्ध करून देण्याकडे कायम दुर्लक्ष केलं जातं. लोकांनी निवडून दिलेले लोक प्रतिनिधीच नंतर लोकांशी नीट बोलायला तयार नसतात. त्यांची भेट घेण्याकरिता नंतर लोकांनाच त्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. नागरिकांच्या महत्वाच्या कामांनाही प्राधान्य दिलं जात नाही. गरजवंतांना आधार देण्याऐवजी धुत्कारले जाते. ज्या लोकांची मने वळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. त्याच लोकांना निवडणुकीनंतर नजर अंदाज केले जात असल्याचे अनेकांचे अनुभव आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानाविषयी नकारत्मक भावना निर्माण होतांना दिसत आहे. सर्वच सारखे ही खंत कधी कधी नागरिकांमधून ऐकायला मिळते. त्यामुळे निवडणुकीनंतरही लोकप्रतिनिधींनी लोकांप्रती तेवढाच कळवळा ठेवावा, या प्रतिक्रियाही यानिमित्ताने ऐकायला मिळत होत्या.  

No comments:

Powered by Blogger.