Latest News

Latest News
Loading...

वेकोलिने रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीवर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास तीव्र आंदोलन, मनसेचे फाल्गुन गोहोकार यांचा इशारा

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळसा वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे शिंदोला ते मुंगोली या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता दगडी कोळशाचा वापर केला जात असल्याने या मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरून सतत उडणाऱ्या धुळीमुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. तसेच या धुळीमुळे गावकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तेंव्हा रस्त्यावरील खड्डे दगडी कोळशाने न बुजविता त्यात मुरूम भरणे गरजेचे झाले आहे. तसेच रस्त्यावर दररोज दोन टँकर पाणी मारण्याची आवश्यक असतांना वेकोलि याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वेकोलिने रस्त्यावरून उडणाऱ्या या धुळीवर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोलिच्या क्षेत्रीय प्रबंधकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. 

वेकोलिच्या कोळसा खाणींमधून दररोज शेकडो ट्रक शिंदोला मार्गाने कोळशाची वाहतूक करतात. कोळसा वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे शिंदोला ते मुंगोली मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे तयार झाल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे छोट्या वाहनधारकांचे या मार्गाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. दुचाकीस्वारांना तर रस्त्यावरून मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागते. जीव मुठीत धरून नागरिकांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे वेकोलि पूर्णपणे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. तसेच या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता वेकोलि कडून दगडी कोळशाचा वापर केला जात आहे. रस्त्यावरील खड्डे दगडी कोळशाने बुजविले जात असल्याने त्यावरून जाणे येणे करणाऱ्या वाहनांमुळे कोळशाची भुकटी तयार होऊन ती धूळ बनून सतत रस्त्यावरून उडत असते. दिवसरात्र या मार्गाने कोळसा वाहतुकीचे ट्रक सुसाट धावत असतात. कोळसा वाहतुकीच्या वाहनांनी हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. कोळसा वाहतुकीच्या वाहनांमुळे या रस्त्यावर सतत धूळ उडत असल्याने धुळ प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. रस्त्यावरून उडणारी ही धूळ आसपासच्या गावात पसरत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कोळशाच्या उडणाऱ्या या धुळीमुळे नागरिकांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासले आहे. 

रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे कास्तकारांचेही अतोनात नुकसान होऊ लागले आहे. शेत पिकांवर धूळ साचून राहत असल्याने उभी पिकं नष्ट होऊ लागली आहेत. झाडांची वाढ न होता झाडे मरू लागली आहेत. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये वेकोलि विषयी कमालीचा संताप निर्माण आहे. रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वेकोलिने वेळीच धुळीवर नियंत्रण न मिळविल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय राहणार नाही. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यावरून सतत धूळ उडत असल्याने जल व वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातातही वाढ झाली आहे. शेतकरी व नागरिकांसाठी हानिकारक ठरू लागलेल्या या धुळ प्रदूषणावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास तथा मागण्यांना गांभीर्याने न घेतल्यास वेकोलिची कोळसा वाहतूक ठप्प पाडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वेकोलिच्या क्षेत्रीय प्रबंधकांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तसेच यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्वी वेकोलि प्रशासन जबाबदार राहणार असल्याचेही फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनात म्हटले आहे. 

निवेदन देतांना फाल्गुन गोहोकार यांच्यासह रणजित बोन्डे, धीरज पिदूरकर, महेश कुचनकर, साई उगे, गौरव बोबडे, मारोती मिलमिले, श्रीकृष्ण पानघाटे, विठ्ठल पानघाटे, बबन बदखल, मयूर बांदूरकर, खोजीराज थेरे, निकेश आत्राम, सुनील उपरे, संजय पंडीले तथा शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते



No comments:

Powered by Blogger.