प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच असून एका पाठोपाठ एक आत्महत्या होत असल्याने तालुका हादरला आहे. सतत होणाऱ्या आत्महत्यांमुळे आता चिंता निर्माण झाली आहे. तालुक्यातील परसोडा (का.) येथील रहिवाशी असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरवार ११ जुलैला रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतला. मोहन लटारी म्हसे (५०) असे या गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहन म्हसे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे ०.४१ हेक्टर शेती आहे. त्यांच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने प्रशासनाकडून समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आस्मानी व सुलतानी संकटांनी वेढलेले शेतकरी विवंचनेतून आत्महत्येचा मार्ग निवडू लागले आहेत. परसोडा येथे परिवारासह राहत असलेल्या शेतकऱ्यानेही विवंचनेतून आत्मघाती निर्णय घेतला आहे. जीवनात आलेल्या नैराश्येतून त्याने मृत्यूचा फास आपल्या गळ्याभोवती आवळला. रात्री कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून झोपल्यानंतर मोहन म्हसे यांनी घरातील व्हरांड्यात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबातील सदस्य झोपेतून उठल्यानंतर त्यांना मोहन म्हसे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या अशा या आत्मघाती निर्णयाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतक मोहन म्हसे यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा आप्त परिवार आहे. त्यांनी आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments: