Latest News

Latest News
Loading...

भगवान सॉ-मिलला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचं लाकडी साहित्य जळून खाक

प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरातील दीपक चौपाटी परिसरातील अतिशय जुना लाकडाचा टाल असलेल्या भगवान सॉ-मिलला रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण सॉ-मिलला आपल्या कवेत घेतले. या भीषण आगीत संपूर्ण सॉ-मिल जळून खाक झाला आहे. अद्यापही आग धुमसत असून लाकडं पेटत आहेत. या आगीत सॉ-मिल मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सॉ-मिलला आग लागल्याची माहिती नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. 

दीपक चौपाटी परिसरातील करण बियरबारच्या अगदीच विरुद्ध बाजूला भगवान सॉ-मिल आहे. अत्यंत जुना असा हा लाकडाचा टाल असून येथून मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्याची विक्री होते. रविवारी ७ जुलैला पहाटे २ वाजताच्या सुमारास या लाकडाच्या टालला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. या सॉ-मिलचा रखवालदार असलेल्या इसमाला सॉ-मिल मधून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. रखवालदाराने टालची पाहणी केल्यानंतर त्याला टालला आग लागल्याचे लक्षात आले. त्याने लगेच मालकाला फोन करून ही माहिती दिली. मात्र तोवर आगीने भीषण रूप धारण केले होते. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण सॉ-मिल आपल्या कवेत घेतला होता. सॉ-मिलला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाची वाहने तात्काळ घटनास्थळी पोहचली. शर्थीच्या प्रयत्नानंतर दोन ते तीन तासांनी आग आटोक्यात आली. पण अजूनही आगीची धग मात्र कायम आहे. सॉ- मिल मधील संपूर्ण लाकडी साहित्य आगीच्या भक्षस्थानी चढलं आहे. सॉ-मिलला लागलेल्या या भीषण आगीत टाल मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. शनिवार सायंकाळ पासून शहरात सारखा पाऊस सुरु आहे. भर पावसात या सॉ-मिलला आग लागली, व सॉ-मिलची जळून राख रांगोळी झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पण अद्याप पृष्टी मात्र झालेली नाही. 

रतनलाल पटेल अँड सन्स या नावाने खूप वर्षांपासून असलेलं भगवान सॉ-मिल हे शहरात लाकडी साहित्याच्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या सॉ-मिल मधून मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्याची विक्री होते. लाकूड फाट्यासह दरवाजे, फर्निचर, खिडक्या, प्लायवूड मटेरियल, सनमाईक व इतरही लाकडी साहित्याची या टाल मधून विक्री होते. नुकतंच या टालाच नूतनीकरण करण्यात आलं आहे. या सॉ-मिलच्या आजूबाजूला अनेक छोटी मोठी दुकाने आहेत. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने आगीच्या झळा या दुकानांपर्यंत पोहचल्या नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सॉ- मिलला लागलेल्या भीषण आगीमुळे मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.



No comments:

Powered by Blogger.