Latest News

Latest News
Loading...

लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ हा प्रसार माध्यमे आहेत, जेष्ठ पत्रकार विनोद ताजणे

प्रशांत चंदनखेडे वणी 

आपल्या देशात लोकशाहीचे चार मजबूत स्तंभ असून प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ आहे. कायदेमंडळ, प्रशासन, न्यायमंडळ व प्रसार माध्यमे या चारही स्तंभावर सकारात्मक अंकुश ठेवण्याचं काम प्रसार माध्यमे करीत असतात. तेंव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे मौलिक विचार जेष्ठ पत्रकार विनोद ताजणे यांनी व्यक्त केले. ते विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेचे ३४ वे पुष्प गुंफतांना प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप व जनतेच्या अपेक्षा या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के हे होते. 

विनोद ताजणे आपल्या भाषणात पुढे बोलतांना म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात छोटी वृत्तपत्र निघत होती. त्यानंतर आकाशवाणी च्या माध्यमातून रेडिओची सुरुवात झाली. रेडिओ नंतर दूरचित्रवानी आली आणि प्रसारमाध्यमांचं जाळ निर्माण झालं. कालांतराने मोबाईल हातात आले, व त्याचं जागतिकीकरण झालं. मात्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्तपत्रांनी आपली विश्वासाहर्ता टिकवून ठेवली. वृत्तपत्राचा कणा हा बातमीदार असतो. बातमीदारांमध्ये चौकसपणा, उत्तम सामान्य ज्ञान, सामाजिक संबंध, विश्वासाहर्ता, तत्परता व निर्भीडपणा असणे आवश्यक आहे. अन्यायाच्या विरोधात सतत चालणारी लढाई म्हणजे पत्रकारिता होय. या लढाईने आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोठी भूमिका बजावली होती. पत्रकारांकडून जनतेच्याही खूप अपेक्षा आहेत. पत्रकारांनी राष्ट्र निर्माण कार्यात महत्वाची भूमिका पार पाडावी, असे सर्वसामान्यांना नेहमी वाटत असते. पत्रकारांनी जनतेसमोर सत्य व वास्तव मांडावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेऊनच पत्रकारांनी लिखाण करावे. आपल्या लिखाणामुळे कुणावर अन्याय होईल अशी भूमिका घेऊ नये.  परंतु आजच्या पत्रकारितेचे स्वरूप अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. निर्भीड पत्रकारिता लुप्त होऊ लागली आहे. आणि पीत पत्रकारितेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. पत्रकारांच्या लिखाणाचं स्वातंत्र्य कमी झालं आहे. पत्रकारांना लिखाणाची मोकळीक राहिलेली नाही. या सगळ्यांमध्ये जाहिरातीला अधिक महत्व असल्याने प्रसारमाध्यमांमध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळत आहे. 

अशोक सोनटक्के यांचंही यावेळी अध्यक्षीय भाषण झालं. ते म्हणाले की, पत्रकार हा प्रहरी असतो. त्याने आपले कर्तव्य निभावले की समाजाची घडी नीट राहते. त्यामुळे त्यांनी आपला कर्तव्यदक्षपणा जपावा अशी समाजाची अपेक्षा असते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ साहित्य संघाचे कार्यक्रम प्रमुख राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय गजानन कासावार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाच्या स्थानिक शाखेचे सचिव अभिजित अणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन गजानन भगत यांनी केले. 

No comments:

Powered by Blogger.