Latest News

Latest News
Loading...

सर्वसामान्यांसाठी काँग्रेस नेते संजय खाडे यांचं चालतं फिरतं जनहित केंद्र सुरु , एका कॉलवर मिळणार शासकीय योजनांची माहिती


प्रशांत चंदनखेडे वणी 

शासनाच्या विविध योजनांचा जनसामान्यांना लाभ घेता यावा याकरिता काँग्रेस कमिटीचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी "चालतं फिरतं जनहित केंद्र" हा अभिनव उपक्रम सुरु केला. स्थानिक खाती चौक येथे नव्याने उघडण्यात आलेल्या कार्यालयात हे चालतं फिरतं जनहित केंद्र सुरु करण्यात आलं आहे. हा स्तुत्यपूर्ण उपक्रम ४ जुलै पासून जनतेच्या सेवेत राबविला जात आहे. ४ जुलैला दुपारी १२ वाजता या केंद्राचं थाटात उदघाटन करण्यात आलं. काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. फक्त एका कॉलवर शासकीय योजनांची संपूर्ण माहिती व या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारी मदत या जनहित केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. विविध योजनांची माहिती मिळविताना व त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करतांना शेतकरी, महिला व सर्वसामान्यांचा गोंधळ उडू नये म्हणून संजय खाडे यांनी हा अभूतपूर्व उपक्रम शहरात राबविला आहे. संजय खाडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून सुरु झालेलं हे चालतं फिरतं जनहित केंद्र सर्वसामान्यांचा त्रास व त्यांचा मनःस्ताप कमी करण्यास मदत करणारं ठरणार आहे. 

महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण व अभिवादन तथा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना मान्यवरांच्या हस्ते श्रद्धांजली वाहिल्यानंतर फीत कापून या जनहित केंद्राचे उद्घाटन व शुभारंभ करण्यात आला. विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी, शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, निराधार यांची होणारी धावपळ व योजनांसंबंधी असलेली अपुरी माहिती तसेच तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थी शासकीय योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहायचे. त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता हे जनहित केंद्र सुरु करण्यात आलं आहे. या जनहित केंद्राच्या माध्यमातून एका कॉलवर शासकीय योजनांची संपूर्ण माहिती व योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता सर्वोत्परी मदत केली जाणार असल्याचे मनोगत संजय खाडे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे होते. 

ऍड. देविदास काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जनहित केंद्राचा ग्रामीण भागातील जनतेला मोठा लाभ होणार असल्याचे सांगतानाच सर्वसामान्य लाभार्थी आता शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नसल्याचे म्हटले. यावेळी जयसिंग गोहोकार, घनश्याम पावडे, संध्या बोबडे, काजल शेख यांचीही भाषणे झाली.  
काय आहे चालतं-फिरतं जनहित केंद्र?
शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा? त्यासाठी कोणती कागदपत्र जोडावी, ऑनलाईन माहिती कशी भरावी? याची पद्धत व तांत्रिक माहिती अनेक लाभार्त्यांना नसते. अशा लाभार्थ्यांना  जनहित केंद्राच्या हेल्पलाईन क्रमांकावर (9637375455) संपर्क साधता येणार आहे. हेल्पलाईन नंबरवर संपर्क करताच जनहित केंद्राची टीम त्या गावात किंवा लाभार्थी राहत असलेल्या ठिकाणी पोहचून लाभार्थ्यांला आवशयक ती सर्व मदत करेल. याशिवाय खाती चौक येथील कार्यालयात देखील लाभार्थ्यांना मदत व सेवा पुरविली जाणार आहे.
 
कार्यक्रमाला सुरेश काकडे, प्रा. शंकर व-हाटे, राजेंद्र कोरडे, पुरुषोत्तम आवारी, अल्का महाकुलकर, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, अनिल देरकर, तेजराज बोढे, अशोक नागभिडकर, अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, मंदा बांगरे, संगिता खाडे, निलीमा काळे, प्रमिला चौधरी, किरण कुत्तरमारे, संगिता मांढरे, डेव्हिड पेरकावार, डॅनी सँड्रावार, महादेव तडेवार, अनंतलाल चौधरी, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, विलास चिकटे, संजय सपाट, सुरेश बनसोड, प्रदीप खेकारे, अशोक पांडे, विठ्ठल पिंपळे, प्रेमनाथ मंगाम, नागोराव आवारी, कुणाल पिंपळे, प्रवीण बदमवार, देवराव देउळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद वासेकर यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मदत मिळालेले लाभार्थी व मदतीसाठी आलेले लाभार्थी तथा शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

No comments:

Powered by Blogger.